मादी बिबट आणि बछड्यांची पुनर्भेट
कराड :
चचेगाव (ता. कराड) येथे बराबाहीची विहार या शिवारात बाबासो पवार यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याचे चार बछडे ऊस तोडताना आज सकाळी 11 वाजता आढळून आले. तातडीने ग्रामस्थानी वनविभागास संपर्क केला. त्यानंतर या बछड्यांची आणि मादीची पुनर्भेट घडवण्यात वनविभागाला यश आले आहे.
ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर सदरचे बछडे वनविभागाने ताब्यात घेतले. चार पिल्ले असल्याने मादी आक्रमक होऊ नये म्हणून त्यांची पुनर्भेट घडवण्याचा निर्णय वनविभागाकडून आला. उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, बाबूराव कदम, वनरक्षक कैलास सानप, अक्षय पाटील, योगेश बडेकर, भरत पवार व वाईल्ड हार्ट रेस्क्यूअर नाईटस्चे अजय महाडिक, रोहित कुलकर्णी, गणेश काळे, सचिन मोहिते, रोहित पवार, विशाल साठे यांनी मादीची व पिल्लांची भेट घडवण्यासाठी विशेष प्रकारे सेटअप लावला. संध्याकाळी 7.10 मिनिटांनी मादी येऊन पहिले पिल्लू घेऊन गेली तर दुसरे पिल्लू 7.36 मिनिटांनी घेऊन गेली आहे.
अजून काही वेळात ती राहिलेली दोन पिल्ले सुखरूप घेऊन जाईल, असा विश्वास वनक्षेत्रपाल ललिता पाटील व वाईल्डहार्ट रेस्क्यूअर नाईटस् चे सदस्य यांनी व्यक्त केला. यात तीन नर जातीचे बछडे तर एक मादी जातीचा बछडा होता.