परतीच्या पावसाचा भातपिकांना दणका
मोठ्या प्रमाणात नुकसान : हाता-तोंडाला आलेली भातपिके आडवी : शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सकाळी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पोसवून आलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांशी शिवारातील भातपिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. हातातोंडाला आलेल्या भात पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी सकाळी या भागात सुमारे दोत तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांवर, गटारीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. गुरुवारच्या पावसामुळे पुन्हा मान्सून चालू झाला की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.
फांद्या विद्युत तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित
बुधवारी दुपारी परतीच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर कोसळून पडल्या होत्या. त्यामुळे पश्चिम भागाच्या अनेक गावांमध्ये बुधवारी रात्री वीज खंडित करण्यात आली होती. ज्या शिवारातील भात पिके आडवी झाली आहेत. त्या शेतकऱ्यांचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
भुईमूग काढणी खोळंबली
तालुक्याच्या काही गावांमध्ये भुईमूग काढणीची कामे सुरू आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शिवारात पाणी साचल्याने भुईमूग काढण्याची कामे लांबणीवर पडली आहेत. आणखी काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास आडवी पिके कुजण्याची भीती आहे.
ऊन पावसाचा खेळ
तालुक्यात गुरुवारी पावसाचा खेळ दिसून आला. कारण सकाळी मुसळधार पाऊस दिवसभर कडक ऊन, पुन्हा सायंकाळी व रात्री जोरदार पाऊस असे चित्र दिवसभर सुरू होते. गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला तर दहानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली आणि दिवसभर कडक ऊन पडले होते. त्यामुळे या वेगळ्याच निसर्गाचा अनुभव नागरिकांना आला. दिवसभर ऊन होते तर सायंकाळी काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू झाली.
आडव्या पिकांवर साचले पाणी : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर फेरले पाणी
वार्ताहर/येळ्ळूर
सतत तीन दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरविले असून, येळ्ळूरसह परिसरातील भातपिके भुईसपाट झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होताना बघून शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. येळ्ळूर, सुळगा (ये.), देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, अवचारहट्टी, धामणे, पिरनवाडी या भागात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात भातपीक घेतले जाते. जमिनीची सुपिकता आणि पाणी धरुन ठेवण्याच्या क्षमतेमुळे या पिकाला अनुकूल वातावरण आहे. त्याचा फायदा शेतकरी वर्गाला नेहमीच होतो. शिवाय याच परिसरातील कांही ठिकाणी भुईमूग, बटाटा आणि रताळी अशी नगदी पिकेही शेतकरी घेतो. या पिकामुळे शेतकऱ्यांच्या हाती चारपैसे खेळत असतात. पण ऐनवेळी परतीच्या पावसाने चांगलाच घोळ घातला आहे. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह सतत तीन दिवस पाऊस होत असल्याने उभी भातपिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे शिवारात पुन्हा पाणीच पाणी झाल्यामुळे भुईसपाट झालेल्या भात पिकावरुन पाणी वाहत आहे. पावसाच्या तडाख्याने भाताचे दाणे झडून केवळ दाण्याशिवाय भातपीक उभे दिसत आहे.
भुईमूगला कोंब, रताळी-बटाटे कुजण्याची भीती
हीच स्थिती भुईमूग,बटाटा व रताळी पिकांची झाली असून भुईमूगला कोंब तर पाण्यामुळे रताळी व बटाटे कुजण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. हाती चार पैसे पडतील या आशेवर असताना पावसात कुजणारे पीक बघावे लागत आहे. वर्षभर राबून हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याचे चित्र पाहात आहे.
यंदाही शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता
मागील वर्षी ऐनवेळी पावसाने दिलेल्या ओढीमुळे पिके म्हणावी तशी भरली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पनात घट झाली. यावर्षी पाऊस पाणी चांगले झाले. पण ऐन सुगीच्या तोंडावर परतीच्या पावसाने पिके भूईसपाट होवून त्यावरुन पाणी गेल्यामुळे पिके कुजून पुन्हा याही वर्षी शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे चित्र आहे. पण राजाने लुटले आणि पावसाने झोडपले तर दाद कोणाकडे मागायची? अशी अवस्था सद्या शेतकरीवर्गाची झाली आहे.