सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठीच उत्तरमधून माघार
कोल्हापूर /प्रतिनिधी :
काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. यामागे अन्य कोणतेही कारण नसल्याची स्पष्टोक्ती खासदार शाहू छत्रपती यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले, एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला.
काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी लाटकर हे काँग्रेस विचाराचे पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत. आमदार सतेज पाटील हे कोल्हापूर जिह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधील राजेश लाटकर यांच्यासह जिह्यातील काँग्रेसच्या अन्य चार जागा तसेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहे.
माघारीनंतर सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच वाहनातून परत आलो असल्याचे खासदार शाहू छत्रपती यांनी पत्रकात म्हटले आहे.
खासदारकीच्या राजीनाम्याची अफवा
उत्तरमधील माघारीनंतर सोशल मीडियावर खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिह्याचा प्रतिनिधी म्हणून संसदेत काम करत आहे. काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार असल्याचे खासदार शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे.
अशा गोष्टी पूर्वनियोजित होऊ शकत नाहीत : संभाजीराजे छत्रपती
छत्रपती कुटुंबाचे खासदार शाहू छत्रपती प्रमुख आहेत. त्यांनी एक लाईन दिली आहे, ती आम्हाला लागू आहे. उत्तरच्या माघारीबाबत जे काही घडल, त्याबद्दल वाईट वाटत, तसं घडायला नको होत. याबाबत शाहू छत्रपती यांनी स्पष्टपणे प्रतिक्रीया दिली आहे. मला जास्त माहिती नाही. या घडामोडी घडल्या त्यावेळी मी नागरपूरला होते. परिवर्तन महाशक्तीची पत्रकार परिषद त्यावेळीच सुरु होती. मला सुद्धा तो एक धक्काच होता. या गोष्टी अचानक घडल्या. अशा गोष्टी पूर्वनियोजित होऊ शकत नाहीत. आमचं छत्रपती घराणं अस करु शकत नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.