‘विश्वास नांगरे पाटील बोलतोय…’ म्हणत निवृत्त शिक्षक दाम्पत्याला महिनाभर ‘डिजिटल अरेस्ट’; 68.8 लाखांची फसवणूक
पुणे : सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असताना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून एका निवृत्त शिक्षक दाम्पत्याला तब्बल महिनाभर ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. अटकेची भीती दाखवत सायबर भामट्यांनी दाम्पत्याकडून 68 लाख 80 हजार रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी 74 वर्षीय निवृत्त महिला शिक्षिकेला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता. त्याने स्वतःची ओळख मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यातील अधिकारी म्हणून करून दिली. तुमच्या नावाशी संबंधित खात्यातून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे सांगत त्याने दाम्पत्याला घाबरवण्यास सुरुवात केली.
यानंतर कथित वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगून आणखी एका व्यक्तीला कॉलवर जोडण्यात आले. या व्यक्तीने स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगत दाम्पत्याशी बराच वेळ संवाद साधला. तपासाच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यांमधील रक्कम, पोस्टातील ठेवी, विमा पॉलिसी आणि घरातील सोन्याची माहिती घेण्यात आली.
‘पैसे सरकारी खात्यात जमा करा, पडताळणीनंतर परत मिळतील’ असे सांगून दाम्पत्याला वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास भाग पाडण्यात आले. सुरुवातीला पोस्टातील सुमारे 40 लाख रुपयांच्या ठेवींची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेली रक्कमही भामट्यांनी घेतली.
फसवणुकीचा प्रकार आणखी गंभीर करण्यासाठी आरोपींनी दाम्पत्याला घरातून बाहेर पडण्यास मनाई केली. दर दोन तासांनी ‘I am safe at home’ असा संदेश पाठवण्याचे आदेश देण्यात आले. घराबाहेर पडल्यास अटक करून तुरुंगात पाठवण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर विमा पॉलिसीच्या माध्यमातूनही पैसे उकळण्यात आले. अशा प्रकारे 29 जुलै ते 1 सप्टेंबरदरम्यान दाम्पत्याकडून एकूण 68.80 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
टीव्हीवरील बातमीमुळे उघड झाला प्रकार
सुमारे महिनाभर मानसिक दबावाखाली राहिल्यानंतर 4 सप्टेंबर रोजी या फसवणुकीचा पर्दाफाश झाला. दूरचित्रवाणीवर एका कार्यक्रमाच्या बातम्यांमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पाहिल्यानंतर दाम्पत्याला संशय आला. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आणि आवाज प्रत्यक्ष अधिकाऱ्यापेक्षा वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने खेड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पैसे ज्या बँक खात्यांमध्ये जमा झाले आणि ज्या मोबाईल क्रमांकांवरून कॉल करण्यात आले, त्यांचा तांत्रिक तपास केला जात आहे.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही अधिकारी फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून अटक करण्याची धमकी देत पैसे मागत नाही. अशा प्रकारचा कॉल आल्यास घाबरून पैसे हस्तांतरित करू नयेत आणि तात्काळ संबंधित पोलिस यंत्रणेशी संपर्क साधावा.