नमाज अदा करतानाच निवृत्त ‘एसएसपी’ची हत्या
काश्मीर-बारामुल्लामध्ये मशिदीत दहशतवाद्यांकडून गोळीबार, हल्लेखोर पसार
वृत्तसंस्था/ बारामुल्ला
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे रविवारी निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. निवृत्त एसएसपी शफी मशिदीत नमाज अदा करण्यासाठी पोहोचले असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर दहशतवादी पळून गेले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून त्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत हल्लेखोरांचा मागमूस लागू शकला नव्हता.
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली. शफी हे मशिदीत सकाळची नमाज अदा करत होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ऊग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. शफी यांना 4 गोळ्या लागल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली. शफी 2012 मध्ये निवृत्त झाले होते. रविवारी सकाळी नमाज अदा करत असताना ते अचानक थांबले. सुऊवातीला मला वाटले की माईक खराब झाला असावा. मात्र नंतर त्यांच्यावर 4 गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले, असे मोहम्मद शफी यांचे भाऊ मोहम्मद मीर याने प्रसारमाध्यमांना सांगितले.
गेल्या 4 दिवसातील तिसरी मोठी घटना
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 4 दिवसातील ही तिसरी मोठी दहशतवादी घटना आहे. यापूर्वी 21 डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये 5 जवान हुतात्मा झाले. पीपल्स अँटी पॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दहशतवाद्यांनी अमेरिकन एम-4 कार्बाईन असॉल्ट रायफलने लष्करावर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला होता. लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर तीन दहशतवादी आपल्या साथीदाराचा मृतदेह आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे ओढत नेताना दिसून आले होते.