निवृत्त मेजर सुभेदार नित्यानंद सावंत यांचे तळवडेत उस्फुर्त स्वागत
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर श्री. नित्यानंद गुणाजी सावंतहे भारतीय सैन्य दलात ३३ वर्षे सेवा बजावून निवृत्त होऊन गावात येताच त्यांच्यावर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टीसह महिलांनी औक्षण करून त्यांचे उस्फुर्त स्वागत केले. या अभूतपूर्व स्वागताने सुभेदार मेजर नित्यानंद सावंत अक्षरशः भारावून गेले. यावेळी तळवडे गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन यथोचित गौरव केला. सुभेदार मेजर नित्यानंद सावंत यांचे प्राथमिक शिक्षण गावात शारदा विद्या मंदिर तळवडे शाळा नं ४ येथे तर माध्यमिक शिक्षण श्री जनता विद्यालयात झाले. त्यानंतर पुढे भारतीय सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याचे त्यांचे ध्येय असल्यामुळे त्यांनी पुण्यात मोठ्या भावाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सैन्य दलाचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर मेजर नित्यानंद सावंत यांची सैन्य दलात भरती झाल्यानंतर सुरुवातीला भोपाळ (मध्य प्रदेश) त्यानंतर त्यांनी हिरसार (हरियाणा), राची (झारखंड), पठाणकोट (पंजाब), पुणे (महाराष्ट्र), चंदीगड (पंजाब), लेह (जम्मू काश्मिर), नवगाव (मध्यप्रदेश), जोधपूर (राजस्थान), दिमापूर (नागालँड), अमृतसर (पंजाब), जम्मू काश्मिर, सिकंदराबाद (आंध्र प्रदेश) या ठिकाणी सेवा बजावली. या सेवेत त्यांनी शिपाई पदावरून नायक, हवालदार, नायक सुभेदार, सुभेदार मेजर पदापर्यंत सेवा बजावली. उल्लेखनीय म्हणजे २७/०६/२००४ ते १४/१२/२००६ या सुमारे अडीच वर्ष कालावधीत भूतान देशाच्या सैन्याला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय सैन्य दलाच्या तुकडीत त्यांची निवड करण्यात आली होती. यावेळी सुभेदार मेजर नित्यानंद सावंत यांनी आपल्या कुटुंबीयांच्या विशेष करून आपले वडील कै गुणाजी सावंत ( दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त) यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच आपण सैन्यदलात ३३ वर्ष देशसेवा करु शकल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.यावेळी तळवडे विकास संस्थेचे अध्यक्ष बाबुराव उर्फ आपा परब, श्री जनता विद्यालय तळवडे ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य शाम मालवणकर, जिल्हा बँकेचे माजी अधिकारी विलास नाईक, तळवडे अर्बन सोसायटीचे चेअरमन विलास परब, व्हाइस चेअरमन राजू परब, सिद्धेश्वर ग्रामोत्कर्ष मंडळाचे रविंद्र सावंत प्रगतशील युवा उद्योजक बाळू मालवणकर, चंद्रा शेटकर, प्रकाश परब, प्रविण परब आदी मान्यवरांसह ग्रामस्थ आणि सावंत कुटुंबीय उपस्थित होते.