निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
छत्रपती संभाजी नगर, मुंबई :
ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी पहाटे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी सन 1961 ते 62 मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले. मराठवाडा, मराठवाड्यातील सामाजिक वास्तव उर्वरित महाराष्ट्रात पोहोचवण्यात नरेंद्र चपळगावकर यांचा मोठा सहभाग होता. नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले.
बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. 16 वर्षे वकिली केल्यानंतर मुंबईत काही काळ वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायपीठ स्थापन झाल्यावर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
सामाजिक व वैचारिक क्षेत्राची मोठी हानी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कतफ&त्वाने समफद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतिशील विचारवंत हरपला आहे. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण कऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे.