Satara : सातारा जिल्ह्यात डिसेंबरची पेन्शन न मिळाल्याने सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल
सातारा जिल्ह्यात निवृत्त कर्मचाऱ्यांची तातडीची मदत मागणी
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचायांना डिसेंबर २०२५ महिन्याची निवृत्तीवेतनाची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने राज्यातील सुमारे १४ हजार सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
ही रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी तसेच वित्त विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित तांत्रिक विभागांना सक्तीची ताकीद देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी संघटनेने केली आहे.
या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सा. रा. अग्रवाल, कार्याध्यक्ष सी. बी. जाधव, एस. एस. चव्हाण, प्रकाश मेघे, ए. एम. रोडे, पिके सावंत, राजाराम विताळकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.