आकाशवाणी केंद्राचे निवृत्त निवेदक सुरेश भावे यांचे निधन
रत्नागिरी
आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे निवृत्त निवेदक
सुरेश भावे ( वय ७९) यांचे रविवारी २६ जानेवारी रोजी रात्री पुण्यात निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. त्यांचा पार्थिव देह आज सोमवारी सकाळी रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
१९७६ साली आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र सुरू झालं. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७७ साली सुरेश भावे यांची तिथे निवड झाली. २००६ साली ते निवृत्त झाले. या काळात त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज केवळ निवेदनाच्या रूपानेच नव्हे, तर श्रुतिका, नभोनाट्ये, रूपकांसह अनेक कार्यक्रमांच्या माध्यमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचत राहिला. त्यांनी श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी क्षेत्रातही त्यांचं योगदान होतं. तसंच कीर्तनकार म्हणूनही त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. आकाशवाणीवरूनही त्यांची काही कीर्तने प्रसारित झाली होती. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह त्यांना लाभला होता.
संगीत क्षेत्राचीही त्यांना जाण होती. त्यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना रत्नागिरीकरांतून व्यक्त होत आहे.