केपीएससी परीक्षा पुन्हा घ्या
आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : नुकत्याच घेण्यात आलेल्या केपीएससी परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत गोंधळ निर्माण करण्यात आला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना समस्येला सामोरे जावे लागले आहे. यासाठी केपीएससी परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात याव्यात, अशी मागणी करत विद्यार्थ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन देण्यात आले. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अर्थबोध न होणे, चुकीच्या पद्धतीने अनुवाद केला आहे. जवळपास 58 प्रश्नांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. प्रश्न न समजल्यामुळे व अर्थबोध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविणे अशक्य झाले आहे. याला मुख्य कारण अनुवादामध्ये त्रुटी हे आहे. दोषयुक्त प्रश्नपत्रिका असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.
इंग्रजी, कन्नड माध्यमचा गोंधळ
दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमधील परिच्छेदामध्ये 8 प्रश्न देण्यात आले होते. सदर परिच्छेदानुसार प्रश्नांची उत्तरे देणे अशक्य ठरले आहे. उद्देशपूर्वक कन्नड माध्यम विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक प्रश्ने इंग्रजीमध्ये विचारण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये निर्माण करण्यात आलेल्या इंग्रजी कन्नड गोंधळामुळे 40 प्रश्नांची उत्तरे न लिहिताच पेपर द्यावा लागला आहे. कन्नड माध्यम विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यात यावा, पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.