मे महिन्यात किरकोळ वाहन विक्रीत नाममात्र वाढ
फाडा संघटनेची माहिती : दुचाकी विक्रीत चांगली वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात मे महिन्यामध्ये किरकोळ वाहन विक्री मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 5 टक्के इतकी माफक वाढलेली आहे. यामध्ये दुचाकी, तीन चाकी आणि ट्रॅक्टर यांची विक्रीमध्ये चांगली कामगिरी दिसून आली आहे.
लग्नविवाहाचा हंगाम त्याचप्रमाणे रब्बी पीक चांगले आल्यामुळे ग्रामीण भागातून वाढलेली मागणी वाहन विक्रीसाठी महत्त्वाची ठरली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन म्हणजेच फाडा यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये 3 टक्के इतकी घसरण झाली असून मे महिन्यात ती 3 लाख 2 हजार 214 इतकी झाली आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात यासारख्या सीमेवरील राज्यांमध्ये भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीमध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये सुद्धा 3 टक्के घसरण पाहायला मिळालीय.
इलेक्ट्रीक वाहनांचापुरवठा कमी
इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत पाहता सुट्या घटकांच्या उपलब्धतेबाबतीमध्ये भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर कमतरता दिसून आल्यामुळे या क्षेत्रातील वाहन मागणी कंपन्यांना अपेक्षेप्रमाणे पूर्ण करता आलेली नाही. दुचाकी वाहन विक्रीमध्ये मात्र 7.3 टक्के इतकी वाढ झाली आहे. तिचाकी वाहन विक्री 6.2टक्के आणि ट्रॅक्टर विक्रीमध्ये 2.7 टक्के इतकी वाढ दर्शवली गेली आहे.
काय म्हणाले फाडा अध्यक्ष
फाडाचे अध्यक्ष सी एस विघ्नेश्वर यांनी म्हटले आहे की दुचाकी वाहन विक्रीमध्ये पाहता किरकोळ विक्री संख्येमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये 2 टक्के घसरण पाहायला मिळालीय. तरीही मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता दुचाकी विक्री 7.31 टक्के इतकी दमदार वाढलेली आहे.