सणासुदीच्या काळात वाहनांची किरकोळ विक्री विक्रमी टप्प्यावर
फाडाच्या आकडेवारीमधून माहिती : भारतात राहिली मजबूत मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील मजबूत मागणीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सणासुदीच्या काळात मोटार वाहनांच्या किरकोळ विक्रीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. यामध्ये ट्रॅक्टर व्यतिरिक्त, सर्व विभागांनी वर्षाच्या आधारावर पाहता वाढ नोंदवली आहे. वाहन विक्रेत्यांची संस्था एफएडीएने (फाडा)मंगळवारी ही माहिती दिली.
या वर्षीच्या 42 दिवसांच्या सणासुदीच्या हंगामात एकूण मोटार वाहनांची विक्री 19 टक्क्यांनी वाढून 37,93,584 युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी 31,95,213 युनिट होती. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरू झालेल्या आणि धनत्रयोदशीच्या 15 दिवसांनी संपलेल्या सणासुदीच्या हंगामात प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 10 टक्क्यांनी वाढून 5,47,246 युनिट्सवर पोहचली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 4,96,047 युनिट होती.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडाचे) चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, ‘नवरात्रीच्या काळात खराब कामगिरी असूनही, दिवाळीपर्यंत परिस्थिती सुधारली आणि 10 टक्के वाढ नोंदवली गेली.’ ते म्हणाले की, सणासुदीच्या काळात स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांना सर्वाधिक मागणी राहिली आहे. त्यामुळे उत्सवी काळ हा वाहन कंपन्यांसाठी लाभदायक ठरला आहे.
त्याचप्रमाणे, दुचाकींची नोंदणी वार्षिक आधारावर 21 टक्क्यांनी वाढून यावर्षी 28,93,107 युनिट्सवर पोहोचली आहे, जी 2022 मध्ये 23,96,665 युनिट्स होती. अनेक श्रेणींमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री नोंदवण्यात आली, विशेषत: ग्रामीण भागाचा यात मोठा वाटा आहे. त्याठिकाणी दुचाकी खरेदीत वाढ झाली आहे. या कालावधीत व्यावसायिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर आठ टक्क्यांनी वाढून 1,23,784 युनिट्स झाली. तीनचाकी वाहनांची नोंदणी 41 टक्क्यांनी वाढून 1,42,875 युनिट्सवर गेली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 1,01,052 युनिट होती. तथापि, ट्रॅक्टर विक्री गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या कालावधीत 86,951 युनिट्सवरून 86,572 युनिट्सवर कमी झाली. त्यात सुधारणा झाली आणि नंतर ती 0.5 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली. यावर्षी सणाचा हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू झाला आणि 25 नोव्हेंबरला संपला.
कार्स महागणार
याचदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी म्हणजे 1 जानेवारी विविध कार कंपन्या आपल्या वाहनांच्या म्हणजेच कार्सच्या किमती वाढवणार आहेत. याबाबत कार उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने सुतोवाच केले आहे. महागाईचा दबाव व वाढलेला खर्च आटोक्यात आणण्यासाठी कंपनीला किमती वाढवणे अपरिहार्य ठरणार आहे. ऑडी ही कंपनीही आपल्या कार्सच्या किमती वाढवणार आहे. यांच्या सोबात टाटा मोटर्स ही कंपनीही आपल्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक कार्सच्या किंमती जानेवारी 2024 पासून वाढवणार आहे, अशी माहिती मिळते आहे.