जूनमध्ये प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 7 टक्क्यांनी घसरली
फाडाच्या आकडेवारीतून माहिती : कडक उन्हामुळे शोरुमला भेट देणाऱ्यांच्या संख्येत घट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत जूनमध्ये वार्षिक सात टक्क्यांनी घट झाली आहे. कडक उन्हामुळे शोरूमला भेट देणाऱ्यांच्या संख्येत 15 टक्के घट हे त्याचे प्रमुख कारण आहे. उद्योग संघटना फडा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
गेल्या महिन्यात एकूण प्रवासी वाहनांची नोंदणी 2,81,566 इतकी होती, जी जून 2023 मध्ये 3,02,000 युनिट्सची होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, ‘उत्पादनांची चांगली उपलब्धता आणि पुरेशा सवलती असूनही वाढती उष्णता आणि उशीर झालेला मान्सून यामुळे ग्राहकांची संख्या 15 टक्क्यांनी घसरली आहे.
डिलर्सच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या वाहनांची माहिती नसणे आणि खरेदीच्या निर्णयात विलंब यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागला. सणासुदीचा हंगाम अजून सुरु झालेला नाही. तेव्हा सध्या तरी प्रवासी वाहन मूळ उपकरणे निर्मात्यांनी (ओईएम) सावध राहणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
व्यावसायिक वाहनांच्या विक्रीवर परिणाम
दुचाकीला ग्राहकांनी जूनमध्ये चांगला प्रतिसाद नोंदवला असला तरी व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत मात्र उत्साह दिसला नाही. जूनमध्ये दुचाकींची नोंदणी पाच टक्क्यांनी वाढून 13,75,889 युनिट झाली. सिंघानिया म्हणाले की, मान्सूनला होणारा विलंब आणि निवडणुकीशी संबंधित बाजारपेठेतील मंदीचा विशेषत: ग्रामीण भागातील विक्रीवर परिणाम झाला, जी मेमधील 59.8 टक्क्यांवरून जूनमध्ये 58.6 टक्क्यांवर घसरली. व्यावसायिक वाहनांची विक्री गेल्या महिन्यात पाच टक्क्यांनी घसरून 72,747 युनिट्सवर आली, जी जून 2023 मध्ये 76,364 युनिट होती.
ट्रॅक्टरची विक्री घटली
जूनमध्ये मात्र ट्रॅक्टर विक्रीने कंपन्यांना निराश केले आहे. जूनमध्ये ट्रॅक्टरची विक्री 28 टक्क्यांनी घसरून 71,029 युनिट झाली. जुलै महिन्यात देशात सर्वदूर मान्सून पोहचला असून या महिन्यात ट्रॅक्टर विक्रीत वाढीची अपेक्षा कंपन्यांनी वर्तवल्या आहेत. तीनचाकी वाहनांची नोंदणी जूनमध्ये पाच टक्क्यांनी वाढून 94,321 युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 89,743 युनिट्स होती. वर्षभराच्या आधारे जूनमध्ये एकूण किरकोळ विक्री किरकोळ वाढून 18,95,552 युनिट्स झाली.