For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शालांत परीक्षांचे निकाल 14 रोजी : जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना

11:41 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
शालांत परीक्षांचे निकाल 14 रोजी   जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना
Advertisement

बेळगाव : मूल्यांकन परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून गुरुवारी अथवा शुक्रवारपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविवार दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिवशी पहिली ते नववीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यामुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना अद्याप आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाचवी, आठवी, नववी या मूल्यांकन परीक्षेसह पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, सहावी, सातवी या वर्गांच्या परीक्षा 11 मार्चपासून घेण्यात आल्या. परंतु मूल्यांकन परीक्षांना न्यायालयाने स्थगिती दिल्याने आठवडाभर परीक्षा रखडल्या गेल्या. सोमवार दि. 25 मार्चपासून रखडलेल्या परीक्षा घेण्यात आल्या. दहावी परीक्षेच्या धर्तीवर पाचवी, आठवी व नववी वर्गांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी शहरातील मोजक्याच केंद्रांवर करण्यात आली. दहावी परीक्षा सांभाळत इतर शिक्षकांना पेपर तपासणीच्या कामाला जुंपण्यात आले होते. पाचवीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. तर आठवी व नववी वर्गांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम गुरुवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित, सरकारी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शुक्रवार दि. 5 रोजी डॉ. बाबू जगजीवनराम यांची जयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. तर दि. 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. याचदिवशी पहिली ते नववीचा निकाल विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. यावर्षी 14 एप्रिलला शालेय परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा आदेश जिल्हाशिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी दिला आहे.  दि. 8 रोजी सरकारी शाळांमध्ये समुदाय दत्त कार्यक्रम होणार असून पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखविल्या जाणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.