महाकुंभपर्वणीचे फलित
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्याची सांगता झाली आहे. यावेळी या महापर्वणीत भाविकांच्या संख्येचा विक्रम झाला आहे. साधारणत: 66 कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि गुप्त असणारी सरस्वती या हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या नद्यांच्या संगमस्थानी या निमित्ताने स्नान केले. ही संख्या संपूर्ण युरोप खंडाच्या लोकसंख्येइतकी, तर अमेरिकेच्या लोकसंख्येच्या साधारण दुप्पट इतकी आहे. अर्थातच, भारतीय प्रसार माध्यमांनी या धार्मिक महोत्सवाला यथोचित प्रसिद्धी तर दिलीच, पण विदेशी माध्यमांचेही लक्ष प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात याकडे वेधले गेले. अशा या महामेळ्याचे व्यवस्थापन करणे हे उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारसमोरचे आव्हान होते. काही दुर्घटनांचा अपवाद वगळता ते प्रशासनाने व्यवस्थित पार पाडले असे म्हणता येते. महाशिवरात्रीपर्यंत 45 दिवस चाललेल्या या महाकुंभमेळ्याच्या काळात त्यासंबंधीच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होणे स्वाभाविक होते. हिंदूंच्या कोणत्याही मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणाऱ्या सामुदायिक उत्सवासंबंधात असे प्रश्न चर्चिले जातात. काही मुद्दे तर हेतुपुरस्सर उकरुनही काढले जातात. अशा प्रचंड गर्दीच्या धार्मिक उत्सवांची आवश्यकता आहे का?, त्याने काय साध्य होते?, अशा धार्मिक पर्वणी साजऱ्या करुन अन्नपाणी, रोजगार किंवा शिक्षण इत्यादींचे प्रश्न सुटणार आहेत का?, कशासाठी इतका खर्च ‘धर्मा’वर करायचा? भारत ‘धर्मनिरपेक्ष’ देश असल्याने सरकारने धार्मिक कारणांसाठी असा खर्च करणे योग्य आहे काय? असे अनेक मुद्दे अनेकांना सुचले. त्यांनी आपापल्या परीने त्यांच्यावर मतेही व्यक्त केली. हिंदू समाज आणि हिंदू धर्म यांच्या संदर्भातच असे ‘धर्मनिरपेक्ष’ प्रश्न केले जातात. अशीच यात्रा मक्केला मुस्लीम धर्मियांचीही दरवर्षी भरते. भारतातूनही अनेक मुस्लीम या यात्रेला जातात. या यात्रेत अनेकदा मोठ्या दुर्घटनाही झालेल्या आहेत. तथापि, त्यांच्या संदर्भात हीच धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारी मंडळी किंवा स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारे राजकीय पक्ष एक चकार शब्दही उच्चारत नाहीत. मग विरोध करणे तर दूरच राहिले. खरे तर मक्केच्या यात्रेमुळे मुस्लीमांचे तरी कोणते प्रश्न सुटतात? पण त्यासंबंधी सर्वांचीच ‘गुपचिळी’ असते. आतापर्यंत भारतातून या यात्रेला जाणाऱ्यांना प्रवासखर्चात अनुदान मिळत होते. याचाच अर्थ असा, की धर्मनिरपेक्ष भारत सरकार ‘धर्मा’साठीच हा खर्च करत होते. पण त्याला कोणाचाच विरोध नव्हता. महाकुंभमेळ्याच्या संदर्भात मात्र या प्रश्नांच्या शिळ्या कढीला पुन्हा ऊत आणला जातो. म्हणजे एकीकडे हिंदू भाविक आपला भक्तीभाव व्यक्त करत संधी साधत असताना तथाकथित पुरोगामी त्यांची धर्मनिरपेक्षतेची (की हिंदूद्वेषाची) हौस भागवून घेण्याची संधीही साधत होते, असा हा विलक्षण योगायोग जुळून आलेला दिसून आला. थोडक्यात काय, तर धर्मप्रेमी आणि धर्मद्वेष्टे या दोघांनाही या महाकुंभमेळ्याने हा अवसर मिळवून दिला आहे, असे म्हणता येते. तथापि, आरोप-प्रत्यारोपांच्या किंवा शंकाकुशंकांच्या मर्यादित दृष्टीकोनातून या महोत्सवाकडे पाहता येणार नाही. या महाकुंभपर्वणीला प्राचीन परंपरा आहे. ती आजवर त्याच उत्साहाने आणि निष्ठेने जपण्यात आली आहे. कुंभमेळ्याचा प्रारंभ अकबराने केला, असा प्रछन्न अपप्रचार या निमित्ताने काही स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून केला गेला. तथापि, हे धादांत असत्य आहे, हे दर्शविणारे असंख्य पुरावे इतिहासात आहेत. अकबराचा जन्मही झाला नव्हता, त्या काळात अनेक विदेशी प्रवासी भारतात आले होते. त्यांनी हे कुंभमेळे, त्यांच्यात उसळणारी भाविकांची गर्दी आणि त्यांचे धार्मिक महत्त्व यांची वर्णने लिहून ठेवली असून ती आज उपलब्ध आहेत. चीनी प्रवाशी ह्यू एन सँग याने त्याच्या भारत वर्णनात प्रयागराज येथील कुंभाचे सविस्तर वर्णन केले आहे. या प्रवाशाने भारतात विद्याग्रहणही केले होते. तो अकबराच्या जन्माआधी किमान 1 हजार वर्षे भारतात आला होता. त्याच्या वर्णनानुसार प्रयाग येथील या धार्मिक महोत्सवाला असंख्य वर्षांची परंपरा आहे. याचा अर्थ असा की या प्रवाशाच्या येण्याआधी कित्येक शतकांपासून हे कुंभमेळे आयोजित होत आहेत. असे स्पष्ट पुरावे असतानाही कित्येकांना आपली ती विशिष्ट ‘उबळ’ आवरत नाही. मग अद्वातद्वा वाक्ताडन केले जाते. हे असूया आणि मत्सरापोटी केले जाते. पण परिणाम असा होतो, की लोकांची श्रद्धा तर कमी होत नाहीच, पण असे गालिप्रदान करणाऱ्यांचेच हसे होते. ते करुन घेण्याची त्यांना बहुतेक हौसच असावी. कारण वारंवार असा अनुभव येऊनही त्यांची ‘जित्याची खोड’ काही जात नाही. या कुंभमेळ्यांना एक सामाजिक अधिष्ठानही आहे. हिंदू समाजातील सर्व घटकांचे लोक त्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. हा एक प्रकारचा समाजसंगम असतो. यातून निश्चितपणे एकात्मतेचा संदेश समाजात जातो आणि अशा एकात्मतेची समाजसंवर्धनासाठी आवश्यकता असते. समाजात एकोपा निर्माण झाल्याशिवाय देशाची प्रगती होत नाही. त्यामुळे अशा मेळ्यांसाठी सरकारी तिजोरीतून खर्च केला जात असेल तो समर्थनीय ठरतो. दुसरे असे, की या महामेळ्यांचे एक अर्थशास्त्रही असते. सरकारला त्यांच्यापासून आर्थिक लाभही होतो, जो पेलेल्या खर्चाच्या कितीतरीपट अधिक असतो. त्यामुळे या खर्चासंबंधी आक्षेप घेण्यात अर्थ नाही. चेंगराचेंगरी किंवा अन्य प्रकारचे अपघात अशावेळी घडतात. ते घडू नयेत अशी सर्वांचीच इच्छा असते. तथापि, अशा घटनांचे राजकीय भांडवल करणे योग्य नाही. मृत्यूकुंभ वगैरे उपमर्दकारक शब्दांचा उपयोग करण्यात आला, पण नंतर सारसारवीही त्वरित करण्यात आली. कदाचित, देशात सध्या देशात असलेल्या वातावरणाचा हा परिणाम असावा. भारताचे राजकारण प्रामुख्याने बहुसंख्य हिंदू समाजाशीच जोडले गेले आहे. त्याला दुखावून कोणताही राजकीय पक्ष यशस्वी होऊ शकणार नाही. कारण या समाजाच्या पाठिंब्याशिवाय कोणालाही राजकीय यश मिळणे शक्य नाही, याची जाणीव हळूहळू होताना दिसून येते. एकंदर, या महाकुंभमेळ्याने अनेक सकारात्मक बाबींना बळकट केले आहे, असे म्हणता येते.