व्यवस्थापन परिषद पुरुष गटाचा निकाल सीलबंद
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापन परिषदेच्या दोन गटाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. यामध्ये डॉ. मंजिरी मोरे यांची बिनविरोध निवड झाली तर पुरुष गटासाठी एका जागेसाठी रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एस. पी. हंगिरगेकर आणि सुटाचे विद्या परिषद सदस्य व कुरुंदवाड येथील प्रा. आर. के. निमट यांच्या उमेदवारीसाठी मतदान झाले. परंतु डॉ. निमट यांनी डॉ. हंगिरगेकर यांच्या सदस्यपदासंदर्भात हरकत घेतल्याने मतदान होऊन निकाल सीलबंद करण्यात आला. कुलपती कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना आल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी 35 जणांनी मतदान केले. दरम्यान, महिला गटातून प्रा. डॉ. मंजिरी मोरे व प्रा. डॉ. निशा मुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात डॉ.मुडे यांनी अर्ज माघारी घेतल्याने डॉ.मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी बैठकीत करण्यात आली. तसेच शिवाजी विद्यापीठ अंतर्गत दोन महाविद्यालयाची संलग्नता का काढू नये म्हणून 120 ची नोटीस देण्यात येणार आहे.
- परीक्षा महाविद्यालयांकडे, पेपर विद्यापीठाचे
पदवी प्रथम वर्ष प्रथम सत्र व द्वितीय सत्राची परीक्षा महाविद्यालयात घेणार यावर विद्या परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. परीक्षा महाविद्यालयांकडे असल्या तरी प्रश्नपत्रिका मात्र, विद्यापीठ काढणार आहे.
- नऊ महाविद्यालयांचे परीक्षा केंद्र रद्द
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक अभ्यासक्रम व आयसीटीला मान्यता देण्यात आली. अनेक महाविद्यालयांनी एम. एस्सी. अभ्यासक्रम सुरू केले असून, कमी मनुष्यबळ असल्याने हे अभ्यासक्रम सुरू ठेवायचे की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु विद्या परिषदेने यंदा हे अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास मान्यता दिली. तर 9 महाविद्यालयाचे परीक्षा सेंटर काढून घेण्यात आले. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन आणि पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना फी माफी करावी अशी मागणी केली होती. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यास मान्यता दिली.