For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल । राजकारणाला दिशा मिळणार ?

12:45 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल  । राजकारणाला दिशा मिळणार

राज्यात गेले दीड वर्ष सुरू असलेल्या उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा फैसला अखेर होणार आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी निर्णय देणार असून या निर्णयावर शिंदे यांचे व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भवितव्य ठरणार आहे. निकालाच्या दोन दिवस आधी झालेल्या नार्वेकर व मुख्यमंत्र्यांमधील गुप्त भेटीबद्दल जोरदार आक्षेप घेताना, देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा निकाल असेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे, तर लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते व आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एकूणच राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या निकालाला आता अवघे काही तासच उरल्याने सगळ्यांची धाकधूक वाढली आहे.

Advertisement

जून २०२२ मध्ये विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ होऊन सत्तांतर झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. सत्तेबरोबरच शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्हही त्यानंतर घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिळविले. तेव्हापासून शिवसेनेच्या दोन गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. एक वर्ष सर्वोच्च न्यायालयात लढाई झाल्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती. या लढाईचा फैसला बुधवारी दुपारी होणार आहे. ठाकरे गटाचा दावा मान्य झाला व पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले आमदार अपात्र ठरले, तर सरकार कोसळेल. शिंदे अपात्र ठरणारच नाहीत व ठरले तरी तेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणू, असे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे. तरीही हे सोपे नाही. त्यामुळे विजयाची खात्री असूनही शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या आमदारांपैकी आदित्य ठाकरे वगळता उर्वरित १४ आमदारांविरुद्ध शिंदे गटाने आपात्रता याचिका दाखल केली आहे. ते अपात्र ठरणार का? हाही कळीचा मुद्दा असणार आहे. तसे झाल्यास गेली दीड वर्ष संघर्ष करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसेल. दोन्हीपैकी कोणाच्या आमदारांवर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळणार? की ही फूट नव्हे तर बहुसंख्य आमदारांनी केलेला नेतृत्वबदल आहे, असा मध्यममार्ग काढून दोन्ही बाजूच्या आमदारांना अभय मिळणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. निकालाबाबत शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून परस्परविरोधी दावे केले जात असले, तरी यामुळे राज्यातले राजकीय वातावरण मात्र तापले आहे.

Advertisement

राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा निकाल ठरणार आहे. पक्षांतरबंदी कायदा तसेच विधिमंडळाचे अधिकार आदी सर्वच घटनात्मक बाबींसंदर्भात देखील या सर्व प्रकरणांत महत्त्वाचा उहापोह झाला आहे. आता या सगळ्यांचा कळसाध्याय गाठला जाणार आहे. अर्थातच हे प्रकरण बुधवारच्या निकालानंतर देखील शमणार नाही. कारण ज्या पक्षाच्या विरोधात हा निर्णय जाईल तो पक्ष अर्थातच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे आणखीन तीन-चार महिने देखील अंतिम निकालासाठी लागू शकतील. मात्र निकाल काय येणार याची धाकधूक मात्र वाढली आहे, हे निश्चित.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.