For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर येणार नियंत्रण

06:14 AM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर येणार नियंत्रण
Advertisement

डिजिटल वापरासंबंधीच्या धोरणाचा मसुदा प्रसिद्ध :  कमाल 1 तास मोबाईल वापरण्यास मिळणार मुभा

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

विद्यार्थ्यांमधील वाढत्या डिजिटल व्यसनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जबाबदार डिजिटल वापरासंबंधीच्या धोरणाचा कच्चा मसुदा सरकारने प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर हा मसुदा तयार करून 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याच्या दिशेने सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Advertisement

सदर धोरणाच्या मसुद्यानुसार शालेय काम वगळता विद्यार्थ्यांना दिवसातून कमाल  1 तास मोबाईल वापरता येईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय झोपण्याच्या एक तास अगोदर सर्व डिजिटल उपकरणे बंद करण्यासंबंधी ‘टेक कर्फ्यू’ लागू करण्याची सूचना देण्यात आली आहे.

प्रत्येक शाळेने स्वत:चे डिजिटल वापराचे धोरण तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्याकरिता डिजिटल वेलनेस कमिटी स्थापन करावी. या समितीत प्राचार्य/मुख्याध्यापक, शिक्षक, मानसिक आरोग्य तज्ञ, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी आणि सायबर गुन्हे पोलीस अधिकारी यांचा समावेश असावा.

हे धोरण तयार करण्यात आरोग्य-कुटुंब कल्याण खाते, बेंगळुरातील निम्हान्स, शिक्ष्ण खाते, विविध शिक्षण संस्थांमधील तज्ञ, पालक व सायबर गुन्हे विभाग यांनी सहभाग घेतला आहे. या धोरणांतर्गत शाळांनी सायबर बुलिंग आणि डिजिटल गैरवापर रोखण्यासाठी विशेष प्रोटोकॉल तयार करावा. विद्यार्थ्यांच्या डिजिटल वापरावर नियंत्रण आणणे आणि सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन करणे ही शिक्षकांची प्रमुख जबाबदारी असेल. शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमधील मोबाईल वापराच्या व्यसनाची लक्षणे ओळखण्यास मदत होईल, असेही धोरणाच्या मसुद्यात सूचविण्यात आले आहे.

मुलांच्या मोबाईल वापरावर बंदीसाठीलवकरच मार्गदर्शक तत्त्वे : मधू बंगारप्पा

राज्यात मुलांमधील मोबाईल व सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार लवकरच समग्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. 16 वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून पुढील अधिवेशनावेळी विधानसभेत मांडली जातील, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले.

मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या मोबाईल वापराच्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी मंत्री मधू बंगारप्पा म्हणाले, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचा अतिरेक ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे देशात प्रथमच कर्नाटकात 16 वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरावर बंदी घालण्यास सरकार सरसावले आहे. इतर देशांमध्ये जारी असणाऱ्या नियमांचे सरकार अध्ययन करत आहे. आंतरराष्ट्रीय बाल संघटनांचे सल्लेही घेतले जातील. हे नियम जारी करण्याआधी पालकांची संमती घेणेही आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

अलीकडेच शाळांमध्ये मोबाईलवर बंदी असली तरी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही. मोबाईल उपयुक्त साधन असले तरी मुलांपर्यंत नुकसानकारक बाबी पोहोचत आहेत. ही बाब धक्काकायद आहे, असेही मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.