राज्योत्सवदिनानिमित्त 1 नोव्हेंबरला मद्य विक्रीवर निर्बंध
बेळगाव : राज्योत्सवानिमित्त 1 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विविध कन्नड संघटना, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मिरवणूक काढली जाते. शहरातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक निघते. या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. कायदा व सुव्यवस्था कायम रहावी. यासाठी शुक्रवार दि. 31 रोजी रात्री 12 पासून रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 पर्यंत शहरातील दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा न्याय दंडाधिकारी भूषण बोरसे यांनी बुधवार दि. 29 रोजी जारी केला आहे. 1 नोव्हेंबर रोजी शहरातील बार, वाईन शॉप, क्लब त्याचबरोबर हॉटेलमध्ये मद्य पिण्यास निर्बंध असणार आहेत. तसेच एपीएमसी येथील केएसबीसीएल डेपो बंद राहणार असून दारू दुकानांना सील करण्यात यावे, असा आदेश पोलीस आयुक्तांनी अबकारी विभागाला बजावला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.