न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँकेवर निर्बंध
मुंबई :
मुंबई स्थित न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. या बातमीनंतर मुंबईत असणाऱ्या बँकेच्या शाखांमध्ये सकाळपासूनच लोकांची पैसे काढून घेण्यासाठी गर्दी दिसून आली. वित्तीय स्थिती चिंताजनक असल्याच्या कारणास्तव रिझर्व्ह बँकेने सदरील बँकेवर बंदी घातली असल्याचे समजते. सदरच्या बंदीनंतर आता ग्राहकांना 6 महिन्यापर्यंत पैसे काढता येणार नसल्याचे समजते. ही बंदीची वार्ता कळताच मुंबईत असणाऱ्या बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. मुंबईत असणाऱ्या न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँकेला आता कर्ज देता येणार नाही, तसेच गुंतवणूकही करता येणार नाही. यासोबत बँकेला उधारीही घेता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. रोखीची टंचाई पाहता रिझर्व्ह बँकेने गुरुवारी बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर निर्बंध जारी केले. याबातमीचा सुगावा लागताच बँकेच्या तमाम ग्राहकांनी तातडीने बँकेच्या शाखेत धाव घेतली. रोजच्या आर्थिक देवाण-घेवाण, बिल भरणे व कर्जाच्या इएमआयबाबत ग्राहक चिंतीत आहेत.
याचदरम्यान रिझर्व्हने पैसे काढण्यावर पूर्णपणे बंदी घातली असली तरी काही अटी शर्थीवर बँकेला कर्मचारी वेतन, भाडे व विज-पाणी बिल सारखी आवश्यक खर्च करण्यासाठी पैसे वापरण्याची मुभा दिलेली आहे.