मल्टिपर्पज सोसायट्यांवरील निर्बंध उठवावेत
डॉ. किरण ठाकुर यांची सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी : मोहोळ यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन
पुणे : पुणे आणि परिसरातील चौफेर कामगिरीमुळे मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. आता मल्टिपर्पज सोसायट्यांवरील निर्बंध उठवण्याच्यादृष्टीने मोहोळ यांनी पावले उचलावीत, अशी मागणी ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी येथे केली. बेळगावचा प्रश्न सोडविण्यासाठी मोहोळ यांनी पुढाकार घेण्याचेही आवाहन त्यांनी केले. केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या एका वर्षाच्या यशस्वी कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव आदी उपस्थित होते. डॉ. किरण ठाकुर म्हणाले, पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिपद मिळणे कठीण असते. मात्र, पुण्यातील चौफेर कामामुळे मुरलीधर मोहोळ यांना ही संधी मिळाली. मोहोळ हे नेहमी हसतमुख आणि प्रसन्न असतात. त्यांच्या कामाचा झपाटा विलक्षण आहे. त्यांनी मल्टिपर्पज सोसायट्यांवरील निर्बंध उठवावेत. बेळगावचा प्रश्न सोडविण्यासाठीही पुढाकार घ्यावा. मोहोळ म्हणाले, पुणे कमी काळात वेगाने वाढलेले शहर आहे. त्याच प्रमाणात नागरी समस्याही वाढल्यामुळे व्यवस्थांवर ताण आला आहे. लोकप्रतिनीधी म्हणून उपलब्ध साधनांचा वापर करीत शहराचा विकास करायचा आहे. वैभवशाली वारसा जपत पुण्याला सर्वोत्तम शहर बनविण्याचा ध्यास आहे.
राज्यात नव्या विमानतळांचा विचार : मोहोळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध आहेत. त्या दोघांचे कामाला प्राधान्य असते. त्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवत जबाबदारी दिली. या दोन्ही नेत्यांमधील संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शनही मला घडले आहे. दोघेही ध्येयाशी अजिबात तडजोड करत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. पुरंदर विमानतळाबाबत सर्व बाबी सकारात्मक असून, भूसंपादन वेगाने सुरू आहे. राज्यात अजून नवी विमानतळे कार्यरत करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्र हा सहकाराचा आत्मा आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठीही भरीव योगदान द्यायचे आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले. मुजुमदार म्हणाले, मोहोळ यांचा एक वर्षाच्या कामाचा दस्तऐवज या ‘कॉफी टेबल बुक’मुळे तयार झाला आहे. मोहोळ केवळ केंद्रीय राज्यमंत्रिपदावर समाधान मानणार नाहीत, त्याहून मोठे कार्य त्यांच्या हातून घडणार असल्याची खात्री आहे. कोरोनाच्या काळातील काम ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.