अमेरिकेकडून भारतीय कंपनीवर निर्बंध
इराणसोबत व्यापार ठरला कारणीभूत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इराणकडून 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या विरोधात अमेरिकेने 12 कंपन्यांवर निर्बंधा लादले आहेत. इराणसोबत कच्च्या तेलाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांच्या कक्षेत भारताची एक कंपनी देखील आली आहे.
भारतीय कंपनी गब्बारो शिप सर्व्हिसेस स्वत:चा टँकर हार्नेटद्वारे इराणच्या कच्च्या तेलाचा पुरवठा आशियाई देशांना करते. हा टँकर इराणकडून पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करणारा कथित घोस्ट फ्लीटचा हिस्सा असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. इराणच्या कच्च्या तेलाच्या व्यापाराशी संबंधित सुमारे 12 कंपन्यांवर आता निर्बंध घालण्यात आले आहेत.
संबंधित कंपन्या युएई, मलेशिया, हाँगकाँग आणि सूरीनाम या देशातील आहेत. निर्बंधांच्या अंतर्गत या कंपन्या अमेरिकेच्या आर्थिक व्यवस्थेत काम करू शकत नाहीत. इराणचा हल्ला इस्रायलमधील सर्वात अधिक लोकसंख्या असलेले शहर तेल अवीवला लक्ष्य करत करण्यात आला होता. याचमुळे सर्वसामान्यांना लक्ष्य करणाऱ्या कृत्याला विरोध केला जाणे आवश्यक असल्याचे उद्गार अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी काढले आहेत.
युद्ध चिघळले तर भारताचे नुकसान
इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध होण्याची भीती व्यक्त होत आहे. हे युद्ध झाले तर मध्यपूर्वेसोबत भारतावरही याचा प्रभाव पडणार आहे. भारत आणि इराण यांच्यात अत्यंत जुने व्यापारी संबंध आहेत. भारत मोठ्या प्रमाणावर इराणला बासमती तांदूळ आणि चहापावडरची निर्यात करतो. तर इराणकडून भारत सूर्यफूलाच्या तेलाची आयत करतो.
इराणला मोठी निर्यात
भारताने 2023-24 मध्ये इराणला 680 दशलक्ष डॉलर्सच्या बासमती तांदळाची निर्यात केली होती. भारत एकूण बासमती तांदळाच्या एकूण उत्पादनाचा 19 टक्के हिस्सा इराणला निर्यात करतो. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले तर याचा थेट प्रभाव तांदळाच्या निर्यातीवर पडणार आहे. इराणला 2023-24 मध्ये 32 दशलक्ष डॉलर्सच्या मूल्याची चहापावडर निर्यात करण्यात आली होती. तर इराणकडून सूर्यफुलाच्या तेलाची आयात करण्यावर भारताचा भर आहे.