हैद्राबादमध्ये होळी सणावर निर्बंध
वृत्तसंस्था/हैद्राबाद
तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये होळी सण साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. दुचाकी वाहनांवरुन एकत्र जाणे आणि इच्छा नसलेल्या व्यक्तींवर रंग उडवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने तेलंगणा सरकारच्या या निर्बंधांवर जोरदार टीका केली असून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रे•ाr ‘नववा निजाम’ असल्यासारखे वागत आहेत, असा टोला लगावला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रंग उडविताना भान राखले पाहिजे. ज्यांची इच्छा नाही त्यांच्यावर रंग उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच घोषणा देणे आणि इच्छा नसलेल्या व्यक्तींच्या अंगावर रंग फासणे किंवा चोपडणे हे टाळावे लागणार आहे, तसे पोलिसांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले असून नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी संबंधितांना दिला आहे.
भाजपचा जोरदार हल्लाबोल
तेलंगणा सरकारचे हे फर्मान ‘तुघलखी’ प्रवृत्तीचे आहे. सध्या रमझानचा महिना सुरु आहे. या संपूर्ण महिन्यात रात्री विशिष्ट समुदाच्या लोकांचा प्रचंड गोंधळ होत असतो. शेकडोंच्या संख्येने दुचाक्यांवरुन लोक घोषणा देत आणि आरडाओरडा करत जात असतात. या हालचालींवर कोणतीही बंधने किंवा निर्बंध प्रशासनाने लादलेले नाहीत. हिंदूंना मात्र एक दिवसही त्यांचा सण मोकळेपणाने साजरा करु दिला जात नाही. हिंदूंच्या सणांवर असे निर्बंध निजामशाहीमध्ये लादले जात असत. राज्यात अद्यापही निजामशाहीच आहे काय, असा प्रश्न या पक्षाने विचारला आहे.
मुस्लीमांना आवाहन करा
हिंदूंच्यावर अन्यायकारक निर्बंध लादण्यापेक्षा प्रशासनाने मुस्लीमांना आवाहन करण्याची आवश्यकता होती. रंगपंचमीचा एक दिवस हिंदूंना सहकार्य करा आणि रंग उडविण्याच्या काळात आपापल्या घरात रहा, असे आवाहन राज्य सरकार मुस्लीमांना करु शकले असते. पण तसे करण्याचे धाडस हे सरकार दाखविणार नाही. ते हिंदूंवरच दंडा उगारणार आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार राजा सिंग यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.