गर्दी रोखण्यासाठी चारचाकी वाहनांवर निर्बंध
मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स : बाजारात खरेदी
बेळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावून चारचाकी वाहनांना निर्बंध घालण्यात आले. बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. रविवारी सुटी असल्याने आबालवृद्धांसह खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली होती. त्यामुळे बाजारपेठेत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, मारुती गल्ली आदी ठिकाणी बॅरिकेड्स लावून चारचाकी वाहनांना रोखण्यात आले. बाजारात बेळगावसह खानापूर, चंदगड, कोकण आणि गोव्यातूनही खरेदीसाठी नागरिक दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे गर्दीबरोबर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यासाठी बॅरिकेड्स लावून चारचाकी वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. बाजारातील गणपत गल्ली, पांगूळ गल्ली, मेणसे गल्ली, नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस रोड, खडेबाजार, किर्लोस्कर रोड आदी ठिकाणी गर्दी दिसत आहे. यासाठी बॅरिकेड्स लावून बंदोबस्त ठेवला आहे.