For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहसील कार्यालयामध्ये वाहन पार्किंगला निर्बंध

11:09 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
तहसील कार्यालयामध्ये वाहन पार्किंगला निर्बंध
Advertisement

पार्किंगसाठी सोय करण्याची नागरिकांची मागणी

Advertisement

बेळगाव : रिसालदार गल्लीत असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहने पार्किंग करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे रिसालदार गल्लीत रस्त्यावर वाहने थांबविली जात असल्याने वाहतूक कोंडीला कारण ठरत आहे. वाहने थांबविण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. रिसालदार गल्ली येथील जुन्या मनपा कार्यालयात तहसीलदार कार्यालय असल्याने या ठिकाणी वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयातील भूमी विभागाचे या ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याने नागरिकांच्या गर्दीत भर पडली आहे.

अनेक नागरिकांची वाहने रस्त्यावरच 

Advertisement

सातबारा उतारे, रेशनकार्ड दुरुस्ती, आधारकार्ड दुरुस्ती, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र आदी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. याबरोबरच बेळगाव वन सेवा केंद्र असल्याने कर भरण्यासाठी शहरातील नागरिकांची कायम वर्दळ असते. बहुतेक जण दुचाकी घेऊन येत असतात. सदर नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी सोय नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावरच वाहने थांबवत आहेत. परिणामी रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वाहने थांबविण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा असतानाही गेट बंद करून ठेवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तहसीलदारांनी याची दखल घेऊन वाहन पार्किंगसाठी सोय करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

नागरिकांची गैरसोय दूर करणार

बंद करण्यात आलेले द्वार नागरिकांच्या वाहन पार्किंगसाठी खुले करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात येईल. असे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे.

- तहसीलदार, बसवराज नागराळ

Advertisement
Tags :

.