बेळगावातील विमानसेवा पूर्ववत करा
बेळगाव चेंबर्स ऑफ कॉमर्सची मागणी : व्यापक लढा उभारण्यासाठी विविध संघटना एकवटल्या
बेळगाव : राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगावकडे पाहिले जाते. या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र मोठे आहे. मात्र वेगवेगळ्या कंपन्यांनी विमानसेवा रद्द केली आहे. त्यामुळे याचा विपरित परिणाम बेळगावातील उद्योगावर होत आहे. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या विमानसेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात, याबाबत खासदारांसह केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे बेळगाव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुरुवारी उद्यमबाग येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी बोलताना पदाधिकारी म्हणाले, सांबरा विमानतळाला मोठी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे विमानसेवा दिल्या जातात. मात्र काही कंपन्यांनी सेवा बंद केल्याने जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांची गैरसोय होत आहे. बेळगावातील दररोज मोठ्या प्रमाणात मालाची निर्यात होते. बेंगळूरनंतर सर्वाधिक जीएसटी बेळगावमधून भरला जातो. अशी परिस्थिती असताना विमानसेवेला महत्त्व देणे गरजेचे आहे. पण विमानसेवा रद्द होत असल्याने या विरोधात आता सर्व संघटनांनी लढा देण्याचे ठरविले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यापूर्वी उडान-2 योजनेंतर्गत अनेक विमान कंपन्यांनी सेवा देण्यास सुरुवात केली होती. पण अलिकडे बेळगावऐवजी हुबळीला महत्त्व दिले जात आहे. बेळगावातून विविध राज्ये आणि प्रदेशांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. पण बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची विमानसेवेअभावी गैरसोय होत आहे याची कल्पना अनेकवेळा खासदार आणि विमानतळ प्राधिकरणाला दिली आहे. विमानसेवा सुरू झाली पाहिजे अन्यथा मोठी समस्या निर्माण होईल. पूर्वीच्या विमानसेवा सुरू करण्यासह नवीन कंपन्यांनीही सेवा दिली पाहिजे.
याबाबत व्यापक लढा उभारण्यासाठी सर्व संघटनांना कळविण्यात आले आहे. हुबळी येथील उडान योजना बंद झाली असली तरीही त्या ठिकाणची विमानसेवा सुरू आहे. मात्र बेळगावात का नाही? बेळगावात अनेक उद्योग व टेक्नॉलॉजी आहे. या ठिकाणी बाहेरून लोक आले तर हे उद्योग चालतील. त्यामुळे विमानसेवा पुन्हा पूर्ववत व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. व्यासपीठावर सेक्रेटरी सतीश कुलकर्णी, खजिनदार संजय पोतदार, राम भंडारी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.