बेळगाव-पंढरपूर रेल्वेसेवा पूर्ववत करा
कलखांब येथील नागरिकांची खासदारांकडे मागणी
बेळगाव : बेळगावमधून पंढरपूरसाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध नसल्यामुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. बेळगावमधून दररोज शेकडो भाविकांची पंढरपूरला ये-जा असते. त्यामुळे बेळगाव-पंढरपूर या मार्गावर रेल्वेसेवा पूर्ववत करावी, अशी मागणी कलखांब येथील श्री ब्रह्मलिंग सार्वजनिक देवस्थान ट्रस्टच्यावतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. काही वर्षांपूर्वी बेळगावमधून पंढरपूरसाठी दररोज दोन एक्सप्रेस उपलब्ध होते. परंतु कोरोनापासून या दोन्ही एक्सप्रेस बंद आहेत. यामुळे बेळगावसह जिल्ह्यातील वारकऱ्यांना थेट रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या प्रवाशांना बेळगाव ते मिरज व तेथून मिळेल त्या रेल्वेने पंढरपूर गाठावे लागत आहे. त्यामुळे बेळगाव-पंढरपूर अथवा हुबळी-पंढरपूर अशी रेल्वेसेवा सुरू करून वारकऱ्यांची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मल्लाप्पा परमोजी, चंद्रकांत सावी, कृष्णात चौगुले, संजय शिप्पूरकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. गावातील 400 ते 500 भाविकांच्या सह्या घेऊन खासदारांना निवेदन देण्यात आले.