विमानतळावरील सेवा पूर्ववत करा
उद्योजक-व्यापाऱ्यांची विमानतळ संचालकांसोबत बैठक
बेळगाव : बेळगाव विमानतळावरील कार्गो सेवा, नवीन शहरांना विमानसेवा सुरू करणे, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात उद्योजक, व्यापाऱ्यांनी नुकतीच विमानतळ संचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये बेळगाव विमानसेवा वाढण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. फौंड्री क्लस्टरच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला बेळगाव परिसरातील उद्योजक उपस्थित होते. बेळगाव हा फौंड्रीसाठी ओळखला जाणारा औद्योगिक पट्टा आहे. त्यामुळे विमानसेवेचा फायदा फौंड्री उद्योगालाही व्हावा, यादृष्टीने कार्गो सेवेबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी मालाचे उत्पादन करण्यात येत असल्याने निर्यातीसाठी एअर कार्गोची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
बेंगळूर, चेन्नई, तिरुपती या शहरांच्या विमानसेवेला 85 टक्क्यांहून अधिक प्रतिसाद असतानाही त्या रद्द केल्या जात आहेत, यावर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. याचा परिणाम बेळगावच्या उद्योग, आरोग्य, शिक्षण, कृषी क्षेत्रावर होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. विमानतळ संचालक त्यागराजन यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला. विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बेळगावमधील नागरिकांच्या प्रतिक्रिया पोहोचविण्यात आल्या आहेत. शक्य तितक्या लवकर विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राम भंडारी, सचिन सबनीस, चैतन्य कुलकर्णी, विनायक लोकुर, एम. के. हेगडे, रोहन जुवळी, सतीश कुलकर्णी, जयंत हुंबरवाडी, राजेंद्र मुंदडा यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे साहाय्यक संचालक पी. एस. देसाई उपस्थित होते.