शेष भारत 17 धावांनी पिछाडीवर
मुकेश चौधरीचे पाच बळी, नासीरचे अर्धशतक : मुकेश चौधरी : 78 धावांत 5 बळी
वृत्तसंस्था, श्रीनगर
येथे सुरु असलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध शेष भारत संघ दुसऱ्या डावात 17 धावांनी पिछाडीवर राहिला आहे. शेष भारत संघाने जम्मू-काश्मीरला पहिल्या डावात 278 धावांवर रोखले. मुकेश चौधरीने 78 धावांत 5 गडी बाद केले. शेष भारताने दुसऱ्या डावात दिवसअखेर 1 बाद 24 धावा जमविल्या होत्या.
या सामन्यात शेष भारताचा पहिला डाव 237 धावांवर आटोपला. त्यानंतर जम्मू-काश्मीरने चिवट फलंदाजी करत पहिल्या डावात 64.2 षटकात 278 धावा जमविल्या. पारस डोग्रा आणि अब्दुल समद तसेच मुजफ्फर यांनी दमदार अर्धशतके झळकाविली. जम्मू-काश्मीरची एकवेळ स्थिती 4 बाद 37 अशी केविलवाणी होती. त्यानंतर डोग्रा आणि समद यांनी पाचव्या गड्यासाठी 101 धावांची शतकी भागिदारी केली. डोग्राने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 143 चेंडूत 75 तर समदने 88 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 57 धावा जमविल्या. खालच्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मुजफ्फरने 58 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 64 धावा झोडपल्या. त्याने डोग्रासमवेत नवव्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. मुकेश चौधरीने 5 तर आकाशदीपने 43 धावांत 3 गडी बाद केले. शेष भारताचा संघ पहिल्या डावात 41 धावांनी पिछाडीवर राहिला. त्यानंतर शेष भारताने दुसऱ्या डावात 15 षटकात 1 बाद 24 धावा जमविल्या होत्या. सांगवान 10 धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक - शेष भारत प. डाव 237, जम्मू-काश्मीर प. डाव सर्वबाद 278 (पारस डोग्रा 75, अब्दुल समद 57, नासिर मुजफ्फर 64, चौधरी 5-78, आकाशदीप 3-43), शेष भारत दु. डाव 1 बाद 24 (सांगवान खेळत आहे 10, घरामी खेळत आहे 10, सुनीलकुमार 1-9).