विमानसेवा कोलमडल्याने ‘वंदे भारत’ला प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-बेंगळूर दरम्यान मागील दोन दिवसात विमानसेवा कोलमडल्याने वंदे भारत एक्स्प्रेसला पसंती दिली जात आहे. शनिवारी बेंगळूर-बेळगाव फेरीवेळी संपूर्ण एक्स्प्रेस फुल्ल असल्याचे चित्र दिसून आले. सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन तसेच विकेंडमुळे शनिवारी रेल्वे पूर्ण क्षमतेने धावली.
इंडिगो कंपनीकडून बेळगाव शहराला सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळी बेंगळूर-बेळगाव अशी विमानसेवा दिली जाते. मागील दोन दिवसात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने इंडिगोची विमानसेवा कोलमडली आहे. शुक्रवारी सायंकाळची बेंगळूर विमान फेरी इंडिगोने रद्द केली. त्यामुळे बेळगावला येणाऱ्या व बेंगळूरला जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती.
दिवाळीनंतर पहिल्यांदाच वंद भारत फुल्ल
बेळगावहून बेंगळूरला वेगवान प्रवास करणाऱ्या ‘वंदे भारत’ला मागील दोन दिवसात प्रवाशांनी पसंती दिली आहे. विमानाने जाणारे प्रवासी वंदे भारतकडे वळल्याचे दिसून आले. शनिवारी दुपारी बेंगळूरहून निघालेली वंदे भारत पूर्ण क्षमतेने बेळगावला आली. दिवाळीनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात वंदे भारतने प्रवासी बेळगावला दाखल झाले.
अधिवेशन काळात गर्दी वाढण्याची शक्यता
यापूर्वी अधिवेशनासाठी येणारे आमदार, त्यांचे सचिव, राज्य सरकारचे अधिकारी हे विमानाने बेळगावमध्ये दाखल होत होते. परंतु, विमानसेवाच कोलमडल्याने या सर्वांना आता वंदे भारतवर अवलंबून रहावे लागले आहे. बरेच जण शनिवारी तर काही जण रविवारी वंदे भारतने बेळगावमध्ये दाखल होत आहेत. अधिवेशन काळातही वंदे भारतला अशाच प्रकारे गर्दी होण्याची शक्यता आहे.
बेळगाव येथील विमानसेवा पूर्वपदावर
कर्मचारी कमतरतेमुळे इंडिगो या विमान कंपनीची संपूर्ण देशभरातील सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे मागील दोन दिवसांपासून बेळगावमधील विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडले. सलग दोन दिवस विमाने रद्द झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र विमानसेवा पूर्वपदावर आली. शनिवारी दिल्ली, बेंगळूर तसेच हैद्राबाद या तिन्ही विमान फेऱ्या सुरळीतपणे सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
भारतातील सर्वात मोठ्या इंडिगो एअरलाईन्समध्ये मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक विमान फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. गुरुवारी बेळगाव-दिल्ली विमानफेरी विलंबाने असल्याने प्रवाशांनी दिल्ली विमानतळावर गोंधळ घातला. तर शुक्रवारी दिल्ली-बेळगाव, बेंगळूर-बेळगाव या विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक जण उत्सव, लग्नसोहळे, कॉर्पोरेट मिटींगसाठी प्रवास करणार होते. त्यांना पुढचे सर्वच कार्यक्रम रद्द करावे लागले. शनिवारी मात्र बेळगाव-दिल्ली, बेळगाव-बेंगळूर व बेळगाव-हैद्राबाद या तिन्ही विमानफेऱ्या सुरळीतपणे सुरू होत्या. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. शनिवारीही देशातील काही भागात विमानसेवा रद्द झाल्या असताना बेळगावमधील विमानसेवा पूर्वपदावर आल्याने प्रवाशांना बेळगाव गाठता आले. सोमवारपासून कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असल्याने रविवारी तसेच सोमवारी आमदार, मंत्री, त्यांचे सचिव हे मोठ्या संख्येने बेळगावला येणार असल्याने त्यांची सोय होणार आहे.