For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुरीनकट्टे नासधूस घटनेच्या निषेधार्थ बंदला प्रतिसाद

12:39 PM Jun 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुरीनकट्टे नासधूस घटनेच्या निषेधार्थ बंदला प्रतिसाद
Advertisement

मोर्चात हजारो नागरिकांचा सहभाग : साहाय्यक आयुक्तांना निवेदन : कडक पोलीस बंदोबस्त

Advertisement

कारवार : हिंदूधर्मियांचे श्रद्धाकेंद्र असलेल्या भटकळ येथील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 लगतच्या मुरीनकट्टे (देवाचा कट्टा) नासधूस घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी दुपारी भटकळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आणि घटनेच्या निषेधार्थ विराट मोर्चा काढण्यात आला. बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि मोर्चात हजारो मुरीनकट्टेप्रेमी सहभागी झाले होते. बंद आणि मोर्चाच्यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंद आणि मोर्चा शांततेत पार पाडल्याने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. बंद आणि मोर्चाची हाक भटकळ तालुक्यातील हिंदूत्ववादी संघटनांनी दिली होती. या हाकेला भटकळ रिक्षाचालक, हिंदू दुकान मालकांनी समर्थन दिले होते.

शिवाय बंद आणि मोर्चाला भटकळ तालुक्यातील नामधारी आणि अन्य समाजांनी समर्थन दिले होते. भटकळ तालुक्याला गुरुवारपासून पाऊस झोडपून काढत आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात भटकळ तालुक्यात 100 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळीही पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मोर्चावर पावसाचे सावट पसरले होते. आणि म्हणून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या हिंदू नेत्यांनी पहिल्यांदा दुर्गादेवी आणि चन्नपट्टण अंजनेयला नारळ वाढवून साकडे घातले व पावसाने विश्रांती घ्यावी, अशी मागणी केली. आश्चर्याची बाब म्हणजे मोर्चा पावसाशिवाय पार पडला. असिस्टंट कमिशनर यांना निवेदन देण्यात आले आणि पुन्हा पावसाचे आगमन झाले.

Advertisement

चन्नपट्टण अंजनेय मंदिरापासून मोर्चाला सुरुवात

चन्नपट्टण अंजनेय मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या हिंदू कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेतले होते. यावेळी मुरीनकट्टे नासधूस करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. नासधूस करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. चिथावणीखोर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिवाय मुरीनकट्टेची तातडीने योग्य स्थळी पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात आली. विराट मोर्चा साहायुक्त आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला आणि निवेदन सादर करण्यात आले.

संवेदनशील भटकळ येथील कायदा आणि सुव्यवस्थेला, बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गालबोट लागू नये म्हणून कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत भटकळ तालुक्यातील मद्य विक्री आणि वाहतूकीवर बंदी घातली होती. शिवाय मद्याच्या साठ्यावरही बंदी घातली होती. बंद आणि मोर्चा सुरळीतपणे पार पाडावा म्हणून भटकळमध्ये 100 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय केएसआरपीच्या पाच तुकड्या आणि जिल्हा सशस्त्र दलाच्या दोन तुकड्या परिस्थितीवर नजर ठेवून होत्या. उत्तरेला होन्नावर-भटकळ व दक्षिणेला उडुपी-भटकळच्या सीमेवरील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर विशेष तपासणी नाक्यांची उभारणी करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.