शिवप्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 120 हून अधिक धारकऱ्यांनी रक्तदान केले. देव, देश आणि धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी आपले रक्त सांडले. हीच उदात्त भावना मनामध्ये ठेवून राष्ट्रीय बांधिलकी जपत या रक्तदानातून एका देशभक्ताचे प्राण वाचावेत या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते, अशी भावना किरण गावडे यांनी व्यक्त केली. यावेळी अनेकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व 5 सदस्यांनी रक्तदान केले. तसेच विशेष म्हणजे धर्मवीर बलिदान मास निमित्त अनेक शिवशंभूभक्त उपवास करत असतात. पण अशा परिस्थितीतही त्यांनी रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला. तब्बल 120 जणांनी या रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला. या सर्व रक्तदात्यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. केएलईच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, गोसेवा प्रमुख तथा प्रचारक हिरामणी मुचंडीकर, विभाग प्रमुख चंद्रशेखर चौगुले, किरण बडवाणाचे, प्रमोद चौगुले, गजानन निलजकर तसेच अनेक धारकरी व शिवशंभुभक्त उपस्थित होते.