सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या घंटानाद आंदोलनाला प्रतिसाद
टर्मिनसचे काम अडविणाऱ्या झारीतल्या शुक्रचार्यांचा बंदोबस्त करा - ॲड. संदीप निंबाळकर
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी रोड टर्मिनसवर रेल्वे गाड्यांना थांबा , टर्मिनसला प्रा.मधू दंडवते यांचे नाव, तसेच रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा अशा विविध मागण्यांसाठी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सवातंत्र्यदिनी घंटानाद आंदोलन छेडले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर माजी आमदार राजन तेली ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आदींनी भेट देऊन घंटानाद आंदोलनाला प्रतिसाद दर्शविला.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. टर्मिनस नामकरण रेल हॅाटेल रस्ता यावर बैठक आयोजित करावी आदींबाबत सविस्तर चर्चा केली.केसरकर म्हणाले की,सावंतवाडी रोड टर्मिनस भूमिपूजन झाले तसे नामकरण करण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल.रस्ता मंजूर असून बैठक आयोजित करुन चर्चा घडवली पाहिजे असे आपण कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी बोललो आहे.रेल्वेत पाणी भरण्यासाठी योजना राबविली जाणार असून मळगाव कुंभार्ली व वेत्ये गावालाही पाणी पुरवठा होईल अशा स्वरुपात आराखडा बनवला आहे.असे श्री केसरकर यांनी सांगितले तसेच रेल हॅाटेल प्रकल्पही मंजूर करण्यात आला आहे.कोकण रेल्वेशी अधिक चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. माजी आमदार राजन तेली म्हणाले की,रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मागण्या पोहचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो.रेल्वे प्रवासी संघटना रेल्वेरोको आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे.त्याला माझा पाठिंबा आहे.प्रसंगी नेतृत्व देखील करेन त्यासाठी प्रवाशांची एकजूट महत्वाची आहे . रेल्वे यंत्रणा दाद देत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी एकजूट दाखवावी.नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही असे त्यांनी सांगितले.कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदिप निंबाळकर म्हणाले की, आजचे आंदोलन हे झोपेच सोंग घेतलेल्या लोकांना जाग आणण्यासाठी आहे.सावंतवाडी टर्मिनसच भूमिपूजन होऊन पन्नास टक्के काम पूर्ण झालं मात्र , उर्वरित काम अडविण्यासाठी काहीजण पुढाकार घेत आहेत.हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ? ते शोधून काढून जनतेने त्यांचा बंदोबस्त करावा.त्याचवेळी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्णत्वास येईल.सावंतवाडी रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्य दिनी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.