मराठा आरक्षणासाठी बोरगावात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद
वार्ताहर आळते
मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई येथील मोर्चानंतर सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढला होता. ‘सगेसोयरे’ असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. ती मागणी मान्य करण्यात आली. परंतु त्यावर अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नसल्याने मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे-पाटील यांनी शुक्रवारपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठवाड्यातील जालन्यातील अंतरवाली सराटी येथे ते उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.शासनाने तातडीने विशेष बैठक बोलावून कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
त्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.त्याला प्रतिसाद म्हणून तासगाव तालुक्यातील बोरगावात सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिलेल्या आश्वसनाची मागणी ताबोडतोब पूर्ण करण्याची मागणी होत आहे. यासाठी बोरगावातील सर्व मराठा समाज बांधव, व्यापारी व दुकानदार यांनी एक दिवस आपली दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देऊन मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे.