बेळगाव-दड्डी बससेवेला प्रतिसाद
बेळगाव : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहनगा-दड्डी यात्रेला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-दड्डी मार्गावर विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. रविवारी 32 तर सोमवारी 25 बसेस दड्डीला धावल्या. विशेषत: महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिवहनला अपेक्षित उत्पन्न प्राप्त होणार आहे. मोहनगा-दड्डी येथील श्री भावेश्वरी देवीची यात्रा तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत चालणार आहे. या काळात प्रवाशांच्या सोयीखातर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. शिवाय प्रवाशांच्या संख्येनुसार अतिरिक्त बस सोडल्या जात आहेत. बेळगाव-दड्डी फुल तिकीट 80 हाफ तिकीट 40 रुपये घेतले जात आहेत. यामध्ये शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जात आहे.
दड्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ
मोहनगा येथील भावेश्वरी देवीच्या यात्रेसाठी बेळगावसह महाराष्ट्र आणि कोकणातून जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बस स्थानकात सोमवारी दड्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. सकाळपासूनच बेळगाव-दड्डीमार्गावर बसफेऱ्या वाढल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत बससेवा सुरू होती. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाबरोबर संकेश्वर आणि हत्तरगी बस स्थानकातूनही विशेष बसची सोय करण्यात आली आहे. यात्रा-जात्रांना प्रारंभ झाल्याने बससेवेवर अतिरिक्त प्रवाशांचा ताण वाढू लागला आहे. आधीच शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच यात्रा काळातील वाढत्या प्रवाशांमुळे परिवहनची डोकेदुखी वाढली आहे.