सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे धिंडवडे
गोव्याभरात पहाटेपर्यंत कर्णकर्कशतेचा कहर : पोलिसांनी दुर्लक्ष करून घेतली बघ्यांची भूमिका
पणजी : बुधवारी सायंकाळी उशिरा दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या नरकासुर दहनाच्या कार्यक्रमांनी संपूर्ण गोवाभरात अनेक ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अक्षरश: धिंडवडे उडवले. कित्येक ठिकाणी सायंकाळी सुरू झालेले कार्यक्रम तथा नरकासुर स्पर्धा पहाटे साडेचार, पाच वाजेपर्यंत चालूच होत्या. बहुतेक ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम करण्यात आले. पणजीतील अनेक भागात पोलिसांनी छापे टाकून आयोजकांना कार्यक्रम बंद करायला भाग पाडल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला. दिवाळीच्या निमित्ताने बुधवारी गोव्यात विविध ठिकाणी अक्षरश: गोंधळ माजविण्यात आला.
अनेक नरकासुर पथकांनी उशिरापर्यंत कानठळ्या बसतील एवढ्या मोठ्या आवाजात पाश्चिमात्य संगीत लावून ठेवले होते तर काही ठिकाणी नियमाचा एवढा भंग करण्यात आला की रात्री बारानंतर ऑर्केस्ट्रासारखे कार्यक्रम सुरू करुन ते पहाटेपर्यंत चालू ठेवून त्या परिसरातील लोकांना त्रास दिला. डिचोली पोलिसांनी तर फोन घेणेदेखील बंद करून टाकले. विशेषत: तेथील पोलिसनिरीक्षकाने तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केले आणि पूर्वकल्पना असून देखील आयोजकांना पूर्णत: अभय दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केवळ आयोजकांकडूनच झाला, असे नाही, तर ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले, त्यांच्याकडून देखील न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाल्याचे दिसून आले.
पहाटेपर्यंत सर्वत्र कर्णकर्कश संगीत
नरकासुराच्या रात्री उशिरापर्यंत गोव्यात अनेक ठिकाणी गोंधळ होतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील रात्री बारानंतर कोणत्याही प्रकारे आवाज सहन केला जाणार नाही असे सांगितले होते. मात्र वास्को, फोंडा, मडगाव, फातोर्डा, कुडचडे आणि सांखळी इत्यादी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत म्हणजे वेळ मर्यादेचे पूर्णत: उल्लंघन करून स्पर्धा चालूच होत्या. तसेच ध्वनी यंत्रणा जोरजोरात चालू होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे गोव्यात सर्रासपणे उल्लंघन झाले.
पणजी पोलिसांकडून थोडासा दिलासा
नरकासुर दहन दिवशीच्या ध्वनिप्रदूषणाबाबत गोवा सरकार गांभीर्याने घेत नसल्यामुळे विशेषत: पोलिस अधिकारी अशा कार्यक्रमाला अभय देतात. जर कुणी याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला तरी तक्रारदारांचे फोन देखील घेत नाहीत. मात्र पणजी पोलिसांनी गुऊवारी पहाटे अर्थात 12 नंतर जनतेकडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन काही ठिकाणी कार्यक्रम बंद केले.
मात्र पणजी शहराच्या जवळच्या भागात ताळगाव, सांत इनेझ, सांताक्रुज इत्यादी भागात जोरजोरात आवाजामध्ये कार्यक्रम चालू होते. रात्रीपासून पहाटेपर्यंत कर्णकर्कश संगीत लावून त्यावर काही युवक धांगडधिंगा करत असल्याचे चित्र दिसत होते. पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना सारे ध्वनी प्रदूषण सहन करावे लागले. पणजीत अनेक ठिकाणी भर रस्त्यावर नरकासुर उभे करून पहाटे जाळण्यात आले. या नरकासुराचे सांगाडे काल गुरुवारी दिवाळीच्या दुपारपर्यंत तसेच होते. अखेर पणजी पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. सांत इनेज येथे एका कॉलनीच्या दारातच भव्य नरकासुर उभा केला आणि पहाटे जाळून टाकला. मात्र त्यामुळे कॉलनीतून बाहेर जाणाऱ्यांना तसेच कॉलनीत प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागले. काही नरकासुरांमध्ये खिळे होते आणि ते लागल्याने वाहनांचे टायर देखील पंक्चर झाले. पणजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नरकासुर दहनानंतरचा कचरा हटविण्याचे काम गुरुवारी दुपारपर्यंत सुरु होते. अनेक रस्त्यांच्या मधोमध नरकासुराचे सांगाडे उभे करून ते जाळले होते. त्यामुळे त्यातून वायर्स व लोखंडी सळ्या बाहेर पडल्या होत्या. शेवटी पणजी पोलिसांनी पणजी मनपा व अग्निशामक दलाच्या मदतीने हे अर्धवट जळालेले सांगाडे काढून बाजूला ठेवले. नरकारसुर करणाऱ्या पथकांच्या या बेपर्वाईवर कारवाई व्हायला हवी होती, पण ती झाली नाही. स्मार्ट व सुशिक्षितांच्या पणजीमध्ये अशा पद्धतीचे काही जणांचे वागणे हे भर दिवाळी दिवशी खटकत होते.
डिचोली पोलिसनिरीक्षकाच्या आशीर्वादाने सांखळीत पहाटेपर्यंत धिंगाण्याचा कार्यक्रम
विठ्ठलपूर सांखळी येथे एका संस्थेने तर रात्री बारानंतर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला. कानठळ्या बसतील एवढा आवाज निघत होता. तो पहाटे साडेतीनपर्यंत चालला. डिचोली पोलिस निरीक्षकाला या कार्यक्रमाची माहिती होती, तरीदेखील त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर आवाज कमी करण्यास पोलीस कंट्रोल रूमला कळविल्यानंतर देखील त्याकडे पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले. यातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा जाणूनबुजून भंग करण्यात आला.
दक्षिण गोव्यात पहाटेपर्यंत चालल्या नरकासूर स्पर्धा,ध्वनिप्रदूषण राहिले केवळ कागदावरच
दीपावलीच्या पूर्व संध्येला दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी नरकासूर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा पहाटेपर्यंत चालल्या होत्या. रात्री दहाच्यानंतर मोठ्याने आवाज केल्यास ध्वनिप्रदूषण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सरकारने दिला होता. मात्र, ही कारवाई केवळ कागदावरच राहिली. ती प्रत्यक्ष कृतीत आलीच नाही. पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेणे पसंत केले. दक्षिण गोव्यात वास्को, फोंडा, शिरोडा, सावर्डे, कुडचडे, मडगाव, फातोर्डा इत्यादी ठिकाणी नरकासूर स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांना प्रत्यक्षात रात्री 8 वाजल्यानंतरच प्रारंभ झाला आणि पहाटेपर्यंत त्या चालल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्पर्धेत पथके देखील ढोल-ताशा वाजवून नाचत होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण सुरूच होते. स्पर्धांच्या बरोबरच मुख्य रस्त्यांच्या बाजूला डीजे बँड लावूनसुद्धा नरकासुराच्या प्रतिमा उभ्या केल्या होत्या. त्यातूनही मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण झालेच. हे प्रदूषण सुद्धा बंद करण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही.
राजकारण्यांमुळे पोलिस बनले बघे
बहुतेक स्पर्धा या राजकारण्यांनी पुरस्कृत केल्या होत्या. या स्पर्धांना राजकीय व्यक्तींचा आशीर्वाद असल्याने पोलिसांनी ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने कोणतीच कृती केली नाही. एक-दोन ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रकार घडला. खास करून वृद्ध नागरिकांना रात्रीच्यावेळी ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊ नये या दृष्टीकोनातून कडक कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. मात्र, स्पर्धांच्या आयोजकांनी त्याला प्रतिसाद दिलाच नाही. सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वीच ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशाचेही पालन झाले नाही. एकूण सरकार, पोलिसांनी ध्वनिप्रदूषण न रोखता तिला अभयच दिल्याचे दिसून आले.