सन्मानामुळे अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा
वेदांत फाऊंडेशनच्या एक्सलन्स अवॉर्डचे वितरण
बेळगाव : वेदांत फाऊंडेशनच्यावतीने समाजात उत्तम कामगिरी केलेल्या शिक्षक, पत्रकार व पोलिसांचा वेदांत एक्सलन्स अवॉर्ड देऊन शनिवारी सन्मान करण्यात आला. महिला विद्यालय शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री, उद्योजक श्रीकांत आजगावकर, विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी, युवराज रत्नाकर, एम. ए. पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षा सविता चंदगडकर यांनी वेदांत फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. व्यासपीठावर उपाध्यक्ष एन. डी. मादार, सचिव जयश्री पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक विभागामध्ये निवृत्त शिक्षिका अंजुदेवी केदनूरकर, कविता परमाणिक, रघुनाथ उत्तूरकर, सुनील देसूरकर, पत्रकार विभागात ‘तरुण भारत’चे क्राईम रिपोर्टर रमेश हिरेमठ, पत्रकार रवींद्र उप्पार, पत्रकार संतोष चिनगुडी, एपीएमसी पोलीस स्थानकाचे हेड काँस्टेबल बसवराज नरगुंद, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे काँस्टेबल लाडजीसाब मुल्तानी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री म्हणाले, समाजामध्ये उत्तम कार्य करणाऱ्यांचा गौरव केल्यास त्यांच्याकडून अधिक चांगले कार्य होणार आहे. विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करतात. एखाद्या समस्येला पत्रकार वाचा फोडतो तर न्याय मिळवून देण्याचे काम पोलीस करतात. त्यामुळे या तिन्ही घटकांना एकत्रित आणण्याचे काम वेदांत फाऊंडेशनने केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले.