बेळगावातून रिसॉर्ट राजकारण?
भाजप नेत्यांची बैठक: कुडलसंगम ते बळ्ळारी पदयात्रेची तयारी
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने हाती घेतलेल्या ‘म्हैसूर चलो’ पदयात्रेची शनिवारी सांगता झाली. यापाठोपाठ भाजपमधील घडामोडी गतिमान झाल्या असून रविवारी एक डझनहून अधिक नेत्यांनी बेळगाव येथे बैठक घेऊन आणखी एका पदयात्रेची रूपरेषा निश्चित केली आहे. या बैठकीमुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व विरोधक यांच्यातील संघर्ष उघड झाला आहे. माजी केंद्रीयमंत्री व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जांबोटी रोडवरील एका रिसॉर्टमध्ये रविवारी सकाळपासून भाजप नेत्यांचा वावर वाढला होता. रिसॉर्टवर झालेल्या बैठकीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून डझनभर नेते बेळगावला आले होते. लवकरच या बैठकीचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, दावणगेरीचे माजी खासदार जी. एम. सिद्धेश्वर, माजी मंत्री कुमार बंगारप्पा, माजी मंत्री अरविंद लिंबावळी, म्हैसूरचे माजी खासदार प्रतापसिंह यांच्यासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनी या बैठकीत भाग घेतला होता. सायंकाळपर्यंत ही बैठक चालली. मुडा येथील भूखंड घोटाळ्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये सहभागी न झालेले नेते एकत्र आले असून ही पदयात्रा प्रायोजित असल्याचा आरोप याआधीच बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केला होता. भूखंड घोटाळा हा केवळ म्हैसूरला मर्यादित आहे. महर्षी वाल्मिकी निगममध्ये झालेल्या 187 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात स्वतंत्र पदयात्रा काढण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला होता. रविवारी झालेल्या बैठकीतही कुडलसंगमपासून बळ्ळारीपर्यंत पदयात्रा काढण्यासंबंधी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बैठक भाजपमधील असंतुष्टांची बैठक आहे. अशा बातम्या पसरू लागल्यानंतर माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांनी यासंबंधी बैठकीतून बाहेर येऊन खुलासा केला आहे. ही बैठक बंडखोर किंवा असंतुष्टांची नाही. पक्ष बळकट कसा करायचा? यासंबंधीची आहे, असे स्पष्ट केले आहे.
प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्या विरोधात खलबते
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे नेतृत्व आम्ही मान्य करणार नाही, असे भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी बेळगावात झालेल्या बैठकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. विजयेंद्र विरोधकांना एकत्रित करून हायकमांड समोर पक्षातील घडामोडी मांडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.