Miraj News | मिरजेत भांडण सोडवणं पडलं महाग; कोचिंग क्लास चालकासह दोन भावांना ८ जणांकडून मारहाण!
मिरजः कोकणे गल्ली येथे भांडण सोडविल्याच्या कारणातून कोचिंग क्लास चालकासह त्यांच्या दोघा भावांना आठ जणांच्या जमावाने काठीने मारहाण केली. याबाबत शरद दिनकर शिंदे (रा. कोकणे गल्ली, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यानुसार संशयीत शैलेश जगताप, अथर्व गोडबोले, प्रदीप साळुंखे, अभिषेक उर्फ भुप्याशिंदे, सुनिल जगताप, उमेश सुर्यवंशी, सौरभ व ऋषिकेश मोतुगडे (सर्व रा. रेवणी गल्ली, मिरज) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रेवणी गल्लीतील एका अल्पवयीन मुलाचे कोकणे गल्ली येथे कापड दुकानात भांडण झाले होते.
त्यावेळी शरद शिंदे यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती केली होती. त्यानंतर ते कोकणे तालिमजवळ बाकड्यावर बसलेले असताना संशयीत आठजण जमाव करुन आले. यावेळी शिंदे यांना भांडणात मध्यस्ती केल्याचा जाब विचारत काठीने मारहाण करण्यात आली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या शिंदे यांच्या दोघा भावांनाही मारहाण करण्यात आली. याबाबत मिरज शहर पोलिसात शरद शिंदे यांनी तक्रार दिली आहे.