आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा
अमित देसाई यांची शरद पवार यांच्याकडे मागणी
बेळगाव : कार्पोरेट कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे. या कपातीमुळे कर्मचारी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कामगार कायद्याचे कठोर पालन करून योग्य सेवा समाप्ती मोबदला कामगारांना दिला जावा, याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करून कामगारांना त्यांचे हक्क मिळवून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) इंजिनिअर सेलचे प्रदेश प्रमुख अमित देसाई यांनी माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी अमित देसाई यांनी शरद पवारांची भेट घेऊन आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या. अचानक नोकरीवरून कमी केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला सेवा समाप्ती पॅकेज देणे अनिवार्य आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला योग्य वैधानिक सूचना व मोबदल्याशिवाय जबरदस्तीने कामावरून कमी करू नये. सध्या मंदीचे सावट असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे अवघड असल्याने कामावरून कमी करू नये.
शरद पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसमोरील या समस्या तातडीने दूर कराव्यात. यासाठी केंद्रीय स्तरावरील यंत्रणांशी संपर्क साधावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.