For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळ्ळारी नाल्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन

06:52 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बळ्ळारी नाल्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन
Advertisement

शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा, वडगावमध्ये झाली बैठक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहराला लागून गेलेल्या बळ्ळारी नाल्यामुळे दरवर्षी शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सततच्या नुकसानीमुळे शेती करणेच बंद केले आहे. त्यामुळे बळ्ळारी नाला स्वच्छ करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Advertisement

बुधवारी वडगावच्या ज्ञानेश्वर मंदिरामध्ये आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. मागील अनेक वर्षांपासून जिल्हा प्रशासनासोबत बळ्ळारी नाल्याच्या प्रश्नाबाबत चर्चा केली जात आहे. परंतु पुढे कोणताच निर्णय घेतला जात नाही. दरवर्षी पावसाळ्यात बळ्ळारी नाल्यातील पाणी ओव्हरफ्लो झाल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जात आहे. जर वेळच्या वेळी नाल्याची स्वच्छता केली असती तर हा प्रश्न उद्भवला नसता.

येळ्ळूर रोडपासून सुरू होणारा हा नाला राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचतो. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व जलपर्णी असल्याने पाण्याचा प्रवाह थांबला जात आहे. यामुळे हे सांडपाणी आसपासच्या शिवारात शिरत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना काही कालावधी दिला जाणार आहे. त्या कालावधीत जर बळ्ळारी नाल्याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बैठकीमध्ये शेतकऱ्यांसह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. रमाकांत कोंडुस्कर, राजू मरवे, जयराज हलगेकर, माधुरी जाधव यांच्यासह इतरांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली. आजवर कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हा प्रश्न सोडवलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून याबाबत जिल्हा प्रशासनाने तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

या बैठकीला जुने बेळगाव, वडगाव, अनगोळ, मजगाव, शहापूर शिवारातील शेतकऱ्यांसह अमोल देसाई, मनोहर हलगेकर, उमेश पाटील, कीर्तीकुमार कुलकर्णी, भाऊराव पाटील, शंकर बाबली, देवकुमार बिर्जे, दिलीप नाईक, माधुरी बिर्जे, संतोष शिवनगेकर, ब्रह्मानंद पाटील, दत्ता पाटील, प्रकाश औंदकर, मंगेश काजोळकर, मनोहर काजोळकर, आर. बी. पाटील, शांताराम बाळेकुंद्री यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.