ग्रामसभेतील ठराव वगळले.. सोयीनुसार मांडले...
अगसगे ग्रामपंचायतच्या पीडीओच्या कारभारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी : ता. पं.- जि. पं.कडे तक्रार नोंदविणार
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्रामसभेच्या ठरावामध्ये ग्रामस्थांनी मांडलेले ठराव वगळून आपल्याला हवे तसे ठराव लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी एन. ए. मुजावर यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा झाली होती. तब्बल सात वर्षांनी ग्रामसभा घेण्यात आली होती. यामुळे उद्योग खात्री योजनेमध्ये जेसीबी, टिप्पर आदी मशीनरी लावून गणपती मंदिर ते तलावापर्यंत रस्ता करण्यात आला आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामधील अभियंता रुद्राप्पा बशेट्टी आणि पीडीओ एन. ए. मुजावर यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव ग्रामस्थांनी केला होता. तसेच सीआरपी रमेश पाटील, कर्नाटक विकास बँकेचे मॅनेजर यांची बदली व्हावी, कलमेश्वर नगरमध्ये अंगणवाडी बांधावी, 15 व्या वित्त योजनेमध्ये प्राथमिक शाळेतील मुलांना रंगमंदिर करावे, क्रीडापटूंना विशेष अनुदान द्यावे, गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळा बॅग, बुक द्यावेत, दिव्यांगांचे शेकडा 57 टक्के अनुदान इतर कामाला वापरण्यात आले आहेत. ते अनुदान परत दिव्यांगांना मिळवून द्यावे, विविध योजनेमधील आश्रय घरे मंजूर करताना विशेष ग्रामसभा घ्यावी, अतीवृष्टीमध्ये कोसळलेली घरे खऱ्या लाभार्थ्यांना मिळाली नाहीत. काही लोकप्रतिनिधींनी अभियंता, तलाठी व पीडीओ यांचा अहवाल नसताना कसे पाच लाखांची घरे मंजूर केली आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी, कॉम्प्युटर उताऱ्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि फी यांचा तपशील बोर्डावर लिहावा. गावामध्ये क्रीडांगण बनवावे, एससीएसटी अनुदानामध्ये खोदाई केलेल्या कूपनलिकेचे पाणी आंबेडकर गल्लीमध्ये येत नाही आदी विकास कामांसंदर्भात ठराव ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी मांडले होते. मात्र जाणूनबुजून ग्रामविकास अधिकारी एन. ए. मुजावर यांनी वरील ठराव वगळून आपल्या मर्जीप्रमाणे ठराव लिहिले आहेत, असा आरोप दलित प्रगतीपर सेनेचे अध्यक्ष शिवपुत्र मेत्री आणि सेफ वॉर्ड समुहाचे अध्यक्ष संतोष मेत्री यांनी केला आहे.
सभेमध्ये नसलेले विषय ठरावामध्ये
29 नोव्हेंबर रोजी झालेली ग्रामसभा सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत तब्बल सात तास झाली होती. यावेळी गावातील अनेक विकास कामांबद्दल चर्चा करून ठराव घालण्यास सांगितले होते. मात्र पीडीओ एन. ए. मुजावर यांनी आपल्याला हवे तसे ठराव लिहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात ग्रामस्थ तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीकडे तक्रार करणार आहेत.
महिन्यानंतर ठरावाची प्रत ग्रामस्थांना
ग्रामसभा 29 नोव्हेंबर रोजी झाली आहे. तेव्हापासून ग्रामस्थ ग्रामसभेच्या ठरावाची प्रत मागण्यासाठी ग्रामपंचायतीचे हेलपाटे मारीत होते. पीडीओ एन. ए. मुजावर हे काही कारणे सांगून वेळकाढूपणा करून प्रत देण्यास टाळाटाळ करीत होते. अखेर ग्रामस्थांनी तालुका पंचायत अधिकारी राजेश दनवाडकर यांच्याकडे तक्रार केली. यामुळे शनिवार दि. 6 रोजी तेरा पानी ठरावाची प्रत संतोष मेत्री यांच्याकडे दिली आहे. यामुळे या ठरावातील विषयांचा उलघडा झाला आहे.
ओंबूडस्मनकडे तक्रार करणार
गणपती मंदिर ते तलावापर्यंतच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या कामाविषयी ग्रामस्थांकडे संबंधित पुरावे आहेत. उद्योग खात्री योजनेच्या मजुरांवर ग्रामपंचायतीने अन्याय केला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित ओंबुडस्मनकडे तक्रार करणार असल्याची माहिती शिवपुत्र मेत्री यांनी दिली. याविषयी माहिती मिळविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी एन. ए. मुजावर यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही.