तानाजी गल्ली नियोजित रेल्वे ओव्हरब्रिज रद्दचा ठराव
महानगरपालिका बैठकीत शाहूनगर कमान-नामकरणावरून दुमत
बेळगाव : शहरातील तानाजी गल्लीत रेल्वे ओव्हरब्रिजची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्यात येऊ नये, अशी मागणी नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी केली. या मागणीला सभागृहाने एकमुखी पाठिंबा दिल्याने महापौर सविता कांबळे यांनी तानाजी गल्लीतील नियोजित रेल्वे ओव्हरब्रिज रद्दचा ठराव पारीत केला. रेल्वे खात्याकडून तानाजी गल्लीत रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तसेच जागेची पाहणीही करण्यात आल्याने स्थानिकांनी या नियोजित रेल्वे ओव्हरब्रिजला तीव्र विरोध केला आहे. खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन देखील नियोजित रेल्वे ओव्हरब्रिज रद्द करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन ओव्हरब्रिज रद्द करण्यासाठी विनंती केली होती. मात्र यासाठी महापालिकेचा ठराव आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गुरुवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत तानाजी गल्लीत रेल्वे ओव्हरब्रिजची आवश्यकता नसल्याने हा ब्रिज रद्द करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित केली. याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने ओव्हरब्रिज रद्दचा ठराव मंजूर करण्यात आला.
शाहूनगरच्या नामकरणावरून दुमत...
शाहूनगरचे छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी केली. मात्र याला आमदार राजू सेठ यांच्यासह विरोधी गटनेते व काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. शाहूनगरची हद्द पहिल्यांदा ठरविण्यात यावी, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शाहूनगर परिसरात कमान उभारण्यासह नामकरण करण्याचा निर्णय तात्काळ न घेता अभ्यासपूर्वक हद्द निश्चिती पहिल्यांदा करावी, अशी मागणी करण्यात आल्याने या विषयावर सभागृह तहकूब करण्यात आले.