अखिल भारतीय साहित्य संमेलनात सीमाप्रश्नाचा ठराव
मध्यवर्ती म. ए. समितीच्या पाठपुराव्याला यश : कलबुर्गीत मराठी-कन्नड अनुवाद केंद्र स्थापन करण्याचाही ठराव
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न लवकर सुटावा, असा ठराव सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आला. कर्नाटक राज्यातील बेळगावसह 865 गावे, अनेक शहरे भाषिक प्रांतरचनेनुसार महाराष्ट्रात सामील करावीत, असा ठराव मंजूर करण्यात आला. याला सर्व साहित्यिक व उपस्थित रसिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने सीमावासियांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
साहित्य संमेलनामध्ये सीमाप्रश्नाचा ठराव मांडावा,अशी प्रमुख मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. या मागणीनुसार सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा ठराव महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी समारोपाच्या सत्रामध्ये मांडला.
साहित्य संमेलनात एकूण 17 ठराव मांडण्यात आले. यामध्ये सीमाप्रश्नाच्या ठरावाचा समावेश होता. गोवा राज्याने मराठी भाषेला गोव्याची राजभाषा म्हणून मान्यता द्यावी, तसेच मराठी-कन्नड या दोन भाषांमधील साहित्यांची देवाणघेवाण होण्यासाठी कलबुर्गी येथे मराठी-कन्नड अनुवाद केंद्र स्थापन करण्यात यावे, असा ठराव मांडण्यात आला.
छत्रपती शहाजी महाराजांच्या स्मारकाच्या संवर्धनाचा ठराव
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज यांची बेंगळूर येथे जहागिरी होती. त्यांची समाधी कर्नाटकातील होदेगिरी येथे आहे. परंतु या समाधीस्थळाचा विकास न झाल्याने संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्या समाधीचे संवर्धन करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला पत्र द्यावे आणि ऐतिहासिक भव्य स्मारक तेथे उभारले जावे, असा ठरावही संमत करण्यात आला.