जिल्हा समन्वयक बाळा गावडेंचा ठाकरे शिवसेनेला रामराम
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे दिला राजीनामा ; ऐन निवडणूकीत उबाठाला धक्का
सावंतवाडी |प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती ,चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या पक्षाचा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देत आता मी तटस्थ राहणार असल्याची भूमिका घेतल्याचे समजते. श्री गावडे यांनी तडकाफडकी पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे . अडीच वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. अडीच वर्षात त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले होते . त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते . ठाकरे शिवसेनना पक्षाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती . पण अनपेक्षितरित्या आलेल्या आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे श्री गावडे नाराज होते. गेले पंधरा दिवस ते पक्षापासून दूर राहिले होते. अखेर आज तडकाफडकी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे म्हटले आहे. श्री गावडे यांचे सुपुत्र ॲड . कौस्तुभ गावडे हे युवासेनेचे तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. श्री गावडे यांच्या राजीनामा सत्रामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला खिंडार पडणार आहे.