... राजीनामा की नाराजीनामा ?
लोकशाहीत संख्याबळाचा खेळ चालतो. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांच्याच हाती सत्ता असते. विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ वाढल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी सभागृहातच आपण राजीनामा जाहीर करणार असल्याचे बसवराज होरट्टी यांनी ठरविले होते. याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून आपल्याला राजीनामा द्यावा लागला, असे त्यांनी खेदाने नमूद केले आहे.
डी. के. शिवकुमार मंत्रिमंडळ विस्ताराला आठ दिवस उलटले तरी त्याचे कवित्व सुरूच आहे. आठ दिवसानंतर खातेवाटप झाले आहे. कर्नाटक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात छोटासा बदल होणार आहे, अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. उर्वरित 20 पैकी 19 जणांना मंत्रिपद मिळाले आहे. शिल्लक एका जागेवर एखाद्या महिला आमदाराला मंत्रिपद द्यावे लागणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर भडकलेला असंतोष अद्याप थंड झाला नाही. ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांच्या मनातील खदखद काही कमी झाली नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या म्हैसूर जिल्ह्यात तर असंतुष्ट नेत्यांची बैठकही झाली आहे.
आमच्या नेत्याला मंत्री करा, या मागणीसाठी सुरू झालेली आंदोलने थांबली नाहीत. सिद्धरामय्या यांचे खंदे समर्थक डॉ. एच. सी. महादेवाप्पा, आमदार के. वेंकटेश, आमदार तन्वीर सेठ या तीन नेत्यांची गुप्त बैठक सुरू आहे, याची माहिती मिळताच सिद्धरामय्या यांचे चिरंजीव व नगरविकासमंत्री डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या हे बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. मंत्रिमंडळ विस्तारावर स्वत: सिद्धरामय्या नाराज आहेत. कारण, त्यांनी जी यादी दिली होती, त्या यादीतील अनेक नेत्यांची नावे वगळून भलत्याच नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे हायकमांडच्या इच्छेनुसार आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन डी. के. शिवकुमार यांना सत्ता सोपविली. हायकमांडला दिलेला शब्द पाळला तरीही हायकमांडने आपल्या बाबतीत असे का वागावे? असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणून सध्या त्यांनी मौन पाळले आहे.
गेल्या आठवडाभरात कोणते खाते कोणाला मिळणार? याची चर्चा सुरू असतानाच विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आता चर्चेचा विषय बनला आहे. तब्बल साडेचार दशके राजकारणात सक्रिय असूनही बसवराज होरट्टी यांनी कधीही आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडू दिले नाहीत. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे संख्याबळ वाढल्याने 14 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, त्याआधीच त्यांना राजीनामा देणे भाग पडले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सूचनेनंतर 7 ऑगस्टलाच त्यांनी राजीनामा दिला. कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात त्यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकशाहीत संख्याबळाचा खेळ चालतो. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांच्याच हाती सत्ता असते. विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ वाढल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी सभागृहातच आपण राजीनामा जाहीर करणार असल्याचे बसवराज होरट्टी यांनी ठरविले होते. याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून आपल्याला राजीनामा द्यावा लागला, असे त्यांनी खेदाने नमूद केले आहे. या घडामोडींमुळे भाजप संतप्त झाला आहे. राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी जबरदस्तीने आपली सही घेतली, असा आरोपही बसवराज होरट्टी यांनी केला आहे. त्यामुळेच या राजीनामा नाट्यानंतर राजकीय नाट्याही रंगले आहे.
वाल्मिकी निगममधील भ्रष्टाचार प्रकरणात कारागृहात जाऊन आलेल्या बी. नागेंद्र यांच्यावर 31 गुन्हे आहेत. तरीही त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. वाल्मिकी निगममधील भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना क्लिन चिट मिळालेली नाही. अशा परिस्थितीत नागेंद्र यांना मंत्रिपद देण्याची घाई कशासाठी? त्यांनी राजीनामा देईपर्यंत आपण अधिवेशन चालू देणार नाही, असे भाजप नेत्यांनी जाहीर केले आहे. विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, पक्षाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आदी नेत्यांनी नागेंद्र यांनी राजीनामा द्यावा यासाठी आघाडीच उघडली आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा तुम्हाला अधिकारच काय आहे? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नागेंद्र यांना दिलेले मंत्रिपद व सभापती बसवराज होरट्टी यांचा बळजबरीने घेतलेला राजीनामा या मुद्द्यावर वादळी चर्चा होणार आहे.
माजी मंत्री व उडुपी-चिक्कमंगळूरचे विद्यमान खासदार कोट श्रीनिवास पुजारी यांनी एका कन्नड दैनिकात बसवराज होरट्टी यांच्या राजीनामा नाट्यावर प्रदीर्घ लेख लिहिला आहे. त्यांनी राजीनामा दिला की मुख्यमंत्र्यांनी घेतला? अशा आशयाचा लेख लिहून बसवराज होरट्टी यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. वयाच्या 34 व्या वर्षी विधान परिषदेवर निवड झालेले बसवराज होरट्टी हे शिक्षक मतदारसंघातून तब्बल आठवेळा परिषदेवर विजयी झाले आहेत. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी 18 मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे सर्वच पक्षात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यांनी कधीच आपली छबी वादग्रस्त होऊ दिली नाही. आपल्या चारित्र्यालाही कलंक लागू दिला नाही. विधान परिषद म्हटली की विचारवंतांचे सभागृह अशी त्याची ओळख असते. आता ही ओळख पुसली जात आहे का? असा प्रश्नही खासदार कोट श्रीनिवास पुजारी यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकातील बदलत्या राजकीय परिस्थितीत मंत्रिपदासाठी इच्छुक नेत्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने बसवराज होरट्टी बळजबरीने राजीनामा घेतला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-रमेश हिरेमठ