प्रथम दिवशीच राजीनामा...
मनासारखी नोकरी मिळणे हे परम भाग्याचे लक्षण आहे. मात्र, हे भाग्य काही जणांनाच लाभते. इतरांना जी मिळेल ती नोकरी आवडून घ्यावी लागते. नोकरीसाठी स्पर्धा तर इतकी तीव्र असते, की जी नोकरी मिळेल, ती सोडण्याचा विचार कोणी मनातही आणू देत नाही. कारण, जर मिळालेली नोकरी सोडली, तर पुन्हा ती मिळेल याची शाश्वती तर नसतेच, पण नोकरी मिळेल तरी की नाही, याचीही काही हमी देता येत नाही. त्यामुळे मिळालेल्या नोकरीला घट्ट चिकटून राहण्याचे धोरण प्रत्येकजण अवलंबित असतो. अशा स्थितीत जर कोणी आपल्या नोकरीच्या प्रथम दिवशीच स्वेच्छेने राजीनामा दिला, ती बाब आश्चर्यकारक ठरल्यावाचून राहणार नाही. नोयडा येथील एक ‘लिंक्डइन यूजर’ खुशी चौरसिया यांनी अन्य एका व्यक्तीचा व्हॉटस्अप स्क्रीनशॉट प्रसिद्ध केला आहे. या व्यक्तीने आपल्या नोकरीच्या प्रथम दिवशीच त्यागपत्र सादर केल्याची माहिती देण्यात आली आहे.
खुशी चौरसिया यांनी या व्यक्तीचे नाव प्रसिद्ध केलेले नाही. तथापि, या व्यक्तीच्या अशा वर्तणुकीसंबंधी अनेकांना आश्चर्य वाटत आहे. आपल्याला हे काम आवडलेले नाही, असे कारण ही व्यक्ती नोकरी प्रथम दिवशीच सोडण्यासाठी देताना दिसून येते. तथापि, तिला हे काम का आवडलेले नाही, याचे कारण मात्र, तिने गुप्त ठेवल्याचे पहावयास मिळते. वास्तविक, तिला नोकरीवर घेताना दिला कामाचे स्वरुप पूर्णत: समजावून दिलेले असल्याचे ही व्यक्ती स्वत:च मान्य करते. तसेच ही नोकरी करण्यास आपण राजी होतो, असेही ती स्पष्ट करते. मात्र, कामाला प्रारंभ करण्यापूर्वीच आपण ही नोकरी काम आवडले नसल्याने सोडत असल्याचेही ती स्पष्ट करते. त्यामुळे या साऱ्या प्रकारासंबंधी एक गूढ निर्माण झाले आहे. कोणतीही नोकरी पहिल्या दिवशी बहुतेकांना चांगली वाटत नाही. मात्र, कालांतराने ते काम आवडू लागते, असेही या व्यक्तीला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. तथापि, तिने अशा प्रकारे नोकरी सोडण्याचा आपला निर्धार सोडला नाही. त्यामुळे सध्या ही व्यक्ती आणि तिचा विचित्र निर्णय चर्चेत आहे.