पॅलेस्टिनी अथॉरिटीच्या पंतप्रधानांचा राजीनामा
मोहम्मद सातायेह यांनी सोडले पद : पॅलेस्टिनी भूकेने तडफडत असल्याचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ पॅलेस्टिनी
पंतप्रधान मोहम्मद सातायेह यांच्यासमवेत पूर्ण सरकारने राजीनामा दिला आहे. गाझापट्टीत पॅलेस्टिनी भूकेने तडफडत आहेत, तेथे इस्रायलकडून सातत्याने हल्ले होत आहेत. वेस्ट बँक आणि जेरूसलेममध्ये देखील हिंसा वाढत आहे. याचमुळे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याकडे राजीनामा सोपविला असल्याचे सातायेह यांनी म्हटले आहे.
मोहम्मद सातायेह यांनी पॅलेस्टाइनचे पंतप्रधान म्हणून कार्यरत असताना गाझाला ‘ब्लड व्हॅली’ नाव दिले होते. 8 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या इस्रायलच्या कारवाईमुळे मारले गेलेल्यांचे मृतदेह दफन करण्यास आता गाझामध्ये जागाच शिल्लक नसल्याचा दावा सातायेह यांनी केला होता.
अध्यक्ष घेणार निर्णय
अध्यक्ष महमूद अब्बास यांना आता सातायेह आणि त्यांच्या सरकारने सोमवारी दिलेला राजीनामा स्वीकारायचा की नाही याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पॅलेस्टिनी अथॉरिटीचा अध्यक्षच राज्याचा प्रमुख असतो. अध्यक्षाची निवड वेस्ट बँक आणि पूर्व जेरूसलेममध्ये लोकशाहीच्या मार्गाने केली जाते. वर्तमान अध्यक्ष महमूद अब्बास आहेत. ते 2005 पासून पॅलेस्टिनी अथॉरिटीचे नेतृत्व करत आहेत. अध्यक्षच पंतप्रधानांची नियुक्ती करतात, पंतप्रधान सरकार स्थापन करण्यासाठी जबाबदार असतो. पंतप्रधानांची नियुक्ती ही अध्यक्षांच्या मर्जीनुसार होत असते. याकरता संसदेच्या मंजुरीची आवश्यकता भासते.
अमेरिकेच्या दबावाची पार्श्वभूमी
अध्यक्ष अब्बास यांच्यावर नवी राजकीय रचना निर्माण करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे. इस्रायल-हमास युद्ध संपल्यावर पॅलेस्टाइन देशाची स्थापना होण्याची शक्यता आहे. या प्रदेशावर कुणाचे शासन असेल यासंबंधी अमेरिका आता इस्रायल आणि पॅलेस्टिनी अथॉरिटीसोबत बोलणी करत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी 18 ऑक्टोबर रोजी युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांदरम्यान गाझापट्टीच्या भविष्यावरून चर्चा झाली होती.
पॅलेस्टिनी अथॉरिटीचे स्वरुप
पॅलेस्टिनी अथॉरिटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टिनी क्षेत्रांमधील शासकीय व्यवस्था म्हणून मान्यताप्राप्त आहे. याचे नेतृत्व पॅलेस्टिनी अध्यक्ष करतात आणि याचे एक कार्यकारी मंडळ असून याला पॅलेस्टाइन लेजिस्लेटिव्ह कौन्सिल म्हटले जाते. पॅलेस्टाइनमध्ये दोन मोठे राजकीय पक्ष असून यात हमास आणि फतह यांचा समावेश आहे. हमास ही शस्त्रसज्ज संघटना असून 2007 पासून गाझापट्टीवर त्याचे नियंत्रण आहे. तर फतहच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी अथॉरिटीचे वेस्ट बँक आणि जेरूसलेमध्ये शासन चालते. पॅलेस्टिनी अथॉरिटी आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टिनींचे प्रतिनिधित्व करते. पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) आणि इस्रायल यांच्यातील ओस्लो करारानंतर 1994 मध्ये पॅलेस्टिनी अथॉरिटीला एक अंतरिम प्रशासकीय व्यवस्था म्हणून स्थापन करण्यात आले होते.