सुखबीरसिंग बादल यांचा पदत्याग
वृत्तसंस्था / चंदीगढ
सुखबीरसिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा त्याग केला आहे. नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण पदत्याग करीत आहोत, अशी घोषणा त्यांनी शुक्रवारी केली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे ते पुत्र असून त्यांनीही पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे. त्यांनी पदत्याग केल्याची माहिती पंजाबचे माजी शिक्षणमंत्री दलजीसिंग चीमा यांनी ‘एक्स’वर केली आहे. त्यामुळे शिरोमणी अकाली दल या पक्षाचे नेतृत्व आता प्रथमच बादल कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बादल यांच्या त्यागपत्रामुळे अकाली दलात हालचाली वाढल्या आहेत. अकाली दलाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष बलविंदरसिंग भुंदर यांनी कार्यकारिणीची तातडीची बैठक येत्या सोमवारी आयोजित केली आहे. या बैठकीत बादल यांचे त्यागपत्र आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर विचार करण्यात येणार आहे. अकाली दलाचे अध्यक्षपद, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणीचे सदस्य निवडण्यासाठी येत्या डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. तथापि, या निवडणुकांच्या आधीच सुखबीरसिंग बादल यांनी पदत्याग केल्याने कार्यकारिणीची बैठक होणार आहे.