सर्बियाचे राष्ट्रपती वुसिक यांचा राजीनामा
पंतप्रधान पदाची निवडणूक लढविणार
वृत्तसंस्था, बेलग्रेड
सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झेंडर वुसिक यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या पावलासोबत त्यांचा दुसरा कार्यकाळ मुदतीपूर्वीच समाप्त झाला आहे. आता 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकीत सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या वतीने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
मी राष्ट्रपतिपदाच्या जबाबदारीचा राजीनामा देतोय. घटनात्मक प्रक्रियेच्या अंतर्गत स्वत:च्या जबाबदाऱ्या संसदेच्या अध्यक्ष एना ब्रनाबिक यांना सोपविल्या आहेत, त्या आता काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून देशाचे कामकाज सांभाळतील असे वुसिक यांनी सांगितले आहे.
माझ्या 9 वर्षांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळादरम्यान देशात शांतता आणि स्थिरता कायम राहिली असा दावा बेलग्रेड येथील राष्ट्रपती भवनाबाहेर समर्थकांच्या गर्दीला संबोधित करताना वुसिक यांनी केला. वुसिक मागील 12 वर्षांपासून सातत्याने राष्ट्रपती किंवा पंतप्रधान म्हणून सत्तेवर राहिले आहेत. घटनात्मक नियमांनुसार ते तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकत नाहीत. याचमुळे जून महिन्यात त्यांनी पदावरून हटण्याचे संकेत दिले होते. संसदीय निवडणुकीद्वारे ते स्वत:चा राजकीय प्रभाव कायम ठेवू इच्छित आहेत.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात मागील जवळपास 2 वर्षांच्या उग्र निदर्शनांनंतर वुसिक यांचा राजीनामा समोर आला आहे. या निदर्शनांची सुरुवात नोव्हेंबर 2024 मध्ये नोवी साद शहराच्या रेल्वेस्थानकाचे छत कोसळल्याने झाली होती. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर सुरू झालेले आंदोलन लवकरच भ्रष्टाचाराच्या विरोधात व्यापक जन-आक्रोश आणि उत्तरदायित्वाच्या मागणीत बदलले होते.
सर्बियाचे संसद चालू महिन्याच्या प्रारंभी विसर्जित करण्यात आली होती आणि आता 25 ऑक्टोबर रोजी मतदानाची घोषणा करण्यात आली आहे. तर राष्ट्रपती पदाची निवडणूक देखील 3 महिन्यांच्या आत करविली जाणार आहे. तर पद सोडण्यापूर्वी वुसिक यांनी मोठा निर्णय घेत 49 लोकांना क्षमादान केले आहे, यात निदर्शनांशी निगडित 23 जण सामील आहेत.